IPL फ्रँचायसी सनरायझर्स हैदराबादने कोरोना व्हायरसच्या लढाईत दहा कोटी रुपयांची जाहीर केली मदत, पाहा कर्णधार डेविड वॉर्नरची रिअक्शन
डेविड वॉर्नर (Photo Credit: Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायसी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) ने गुरुवारी कोरोना व्हायरस मदतनिधीसाठी दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) लढाईत क्रिकेट जगातील अनेक खेळाडू आणि संघटनांनी निधी दान केला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या मालकीच्या सन टीव्हीने (SUN TV) दहा कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे. परंतु, ही रक्कम राज्य सरकार किंवा पीएम केअर्स फंडपैकी कोणाला दिली जाईल, हे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले नाही. सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये सन टीव्ही कोरोनाच्या लढाईत दहा कोटी रुपये देण्याचे सांगितले गेले आहे. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी देणगीची रक्कम दिली आहे. बीसीसीआयने स्वतः 51 कोटी रुपयांची मदत केली आहे. या लढाईत विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे यांनीही आपल्या परीने मदत केली आहे. आणि आता या यादीमध्ये हैदराबादचे नावही जोडले गेले आहे. (डेविड वॉर्नरला बॅटने स्वतः सारखी तलवारबाजी करताना पाहून रवींद्र जडेजा ने दिली अशी प्रतिक्रिया, पाहा Video)

सनरायझर्सचा स्टार फलंदाज डेविड वॉर्नर यानेही “हे किती चांगले आहे, चांगले केले सन टीव्ही ग्रुप, @SunRisers” असे लिहून त्यांच्या भावनेचे कौतुक केले. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार भारतात आजवर या व्हायरसमुळे 166 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतात 5 हजार हुन अधिकांना याव्हायरसची लागण झाली आहे.कोरोनाचा प्रभाव जगभरातील क्रीडा स्पर्धांवरशी पडला आहे. आयपीएल 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून होणार होती.

जगभरात या आजारामुळे हजारो लोकं मरण पावले आहेत. भारतातही आतापर्यंत पाच हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळली आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) पश्चिम बंगाल सरकारला 25 लाख आणि कॅबचे अध्यक्ष अविशेक डालमिया यांनी वैयक्तिक 5 लाख रुपये दिले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने कॅबच्या मार्गाचा अवलंब केला आणि त्यांच्या संबंधित राज्य सरकारांना हातभार लावला.