मुंबईला यंदाच्या आयपीएलमध्ये आव्हान कायम ठेवायचे असेल तर आज के.एल. राहुलच्या लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभूत करावेच लागणार आहे. रोहित शर्माचा 30 एप्रिल हा वाढदिवस. या दिवशी तरी आपल्या संघातील या महान खेळाडूला विजयाची भेट त्याचे मुंबई इंडियन्समधील सहकारी देणार का, याची उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लखनौला सहाव्या विजयाची आस लागली असून त्यांनाही प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी विजय आवश्यक आहे.मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये 9 पैकी 6 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर, केवळ तीन मॅचमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. (हेही वाचा - KKR Beat DC IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 7 गडी राखून पराभव, फिलिप सॉल्टचे शानदार अर्धशतक)
के.एल. राहुल लखनौसाठी सलामीला फलंदाजीला येतो. मात्र, पॉवरप्लेमध्येही त्याच्याकडून आक्रमक फटकेबाजी केली जात नाही. अर्थात त्याने 144.27च्या स्ट्राईकरेटने 378 धावा फटकावल्या आहेत. मागील लढतीत राजस्थानकडून लखनौचा पराभव झाल्यानंतर आता के.एल. राहुलच्या नेतृत्वात लखनौला विजयी पुनरागमनाची आशा असेल.
आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंटस आणि मुंबई इंडियन्स चारवेळा आमने सामने आले आहेत. तीन मॅच लखनौनं जिंकल्या तर मुंबईनं एक मॅच जिंकली आहे. रोहित शर्मा (311 धावा) व सूर्यकुमार यादव (166 धावा) यांनी मुंबईसाठी समाधानकारक फलंदाजी केली आहे; पण आयपीएलमधील उर्वरित लढतींमध्ये त्यांच्याकडून आणखी चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. जून महिन्यात वेस्ट इंडीज व अमेरिका येथे होत असलेल्या टी-20 विश्वकरंडकाआधी दोघांनी फॉर्ममध्ये येण्याची नितांत गरज आहे. असे झाल्यास भारतीय संघासाठी ही आनंदाची बाब असणार आहे.