डॅनियल सॅम्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs GT: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या आयपीएल (IPL) 2022 मधील 51 व्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अखेरच्या षटकांत बाजी मारली आणि अवघ्या 5 धावांनी थरारक विजयाची नोंद केली. या सामन्यात पराभवामुळे गुजरात टायटन्सचे प्लेऑफ तिकीट पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. मुंबईने दिलेल्या 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघ निर्धारित 20 षटकांत 5 बाद 172 धावाच करू शकले. परिणामी मुंबईच्या ‘पलटन’ने दुसरा विजय खिशात घातला आणि गुजरातला तिसऱ्या पराभवाचा आस्वाद घेणे भाग पाडले. गुजरात 11 पैकी 8 सामने जिंकून पॉईंट टेबलमध्ये अव्वल आहेत तर मुंबई 10 पैकी दोन सामने जिंकूनही तळाशी 10 व्या क्रमांकावर कायम आहेत. मुंबईच्या या विजयात गोलंदाजांनी विशेषतः डॅनियल सॅम्सने निर्णायक भूमिका बजावली कारण एकवेळी गुजरातने सामन्यावर एकहाती वर्चस्व मिळवले होते. पण मोक्याच्या क्षणी शानदार बॉलिंगने घात केला आणि मुंबईच्या झोळीत दुसरा विजय पाडला. (IPL 2022, MI vs GT: गुजरातविरुद्ध Rohit Sharma याचा धमाका, मुंबई इंडियन्ससाठी ‘हा’ अफलातून कारनामा करणारा ठरला दुसरा फलंदाज)

मुंबईकडून मुरुगन अश्विनने सर्वाधिक दोन तर किरॉन पोलार्डने एक विकेट घेतली. दुसरीकडे, मुंबईच्या विजयाने रिद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांचे अर्धशतकी प्रयत्न व्यर्थ ठरले. साहाने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर शुभमनने 52 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार हार्दिक पांड्या 24 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा विजय, तर गुजरातने सलग दुसरा सामना गमावला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने गुजरातसमोर 178 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईकडून ईशान किशनने 45, रोहित शर्माने 43 आणि टिम डेव्हिडने 44 धावांची नाबाद खेळी केली. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाचे सलामीवीर साहा आणि गिल यांनी चांगली सुरुवात करून पहिल्या विकेटसाठी 106 धावा जोडल्या. यानंतर मुंबईने जोरदार पुनरागमन केले. गुजरातला शेवटच्या दोन षटकात 20 धावांची गरज होती. बुमराहने 19व्या षटकात 11 धावा दिल्या. तर डॅनियल सॅम्सने शेवटच्या षटकात केवळ 3 धावा देत अप्रतिम गोलंदाजी केली.

गुजरातविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईच्या ताफ्यात परतलेल्या मुरुगन अश्विनने आपल्या एका ओव्हरमध्ये गुजरातच्या दोन्ही फलंदाजांना पॅव्हिलियनमध्ये धाडलं. पण एकाच षटकात दोन गडी गमावल्या नंतरही गुजरातच्या हार्दिक आणि साई सुदर्शन यांनी संघाची धावगती कमी होऊ दिली नाही. दोघांनी काही मोठे फटके खेळले. गुजरात विजयाच्या जवळ पोहोचला असताना पोलार्डच्या गोलंदाजीवर सुदर्शन 11 चेंडूत 14 धावा करून हिट विकेट आऊट झाला. अंतिम ओव्हरमध्ये गुजरातला 9 धावांची गरज होती आणि डॅनियल सॅम्स गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर त्याने धाव दिली, तर दुसऱ्या चेंडूवर राहुल तेवतिया धाव घेऊ शकला नाही. तिसऱ्या चेंडूवर धावा चोरण्याच्या प्रयत्नात तेवतिया 3 धावांवर रनआऊट झाला. चौथा चेंडू खेळायला आलेल्या राशिद खानला येताच मोठा फटका मारायचा होता पण त्याने चेंडू उंचावर मारला. सॅम्सने त्याचा झेल सोडला आणि गुजरातने एक धाव घेतली. मिलर पाच आणि अखेरच्या चेंडूवर धाव घेण्यात अपयशी ठरला. अशाप्रकारे मुंबईने रोमहर्षक सामना जिंकला.