इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 साठी पुढील महिन्यात मेगा लिलाव होणार आहे. यापूर्वी 2 नवीन संघांना त्यांच्या ताफ्यात 3 खेळाडूंची निवड करायची आहे. यादरम्यान अहमदाबाद फ्रँचायझींच्या (Ahmedabad Franchise) खेळाडूंची यादी समोर आली आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) व्यतिरिक्त फ्रँचायझीने आयपीएल (IPL) 2021 साठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादने रिलीज केलेल्या प्रत्येकी एक खेळाडूचा समावेश केला आहे. हार्दिकचा पगार 4 कोटींनी वाढला आहे. यावेळी टी-20 लीगमध्ये 8 ऐवजी 10 संघ जेतेपदासाठी लढताना दिसतील. तर अलीकडेच 8 जुन्या संघांनी 27 खेळाडूंना कायम ठेवले होते. 22 जानेवारीपर्यंत नवीन संघांना खेळाडूंचा समावेश करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. (IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावापूर्वी वाढली श्रेयस अय्यरची डिमांड, RCB समवेत दोन लावू शकणार मोठी बोली)
आता अहमदाबाद फ्रँचायझीबद्दल बोलायचे तर क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्या व्यतिरिक्त अहमदाबादने शुभमन गिल आणि अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान यांना ताफ्यात सामील केले आहे. गिल गेल्या मोसमात केकेआरकडून खेळला होता. मात्र, संघाने त्याला यावेळी बाहेर केले आहे तर, राशिद बराच काळ सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. मात्र यावर्षी त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. पांड्या आणि खानला प्रत्येकी 15 कोटी रुपयांत फ्रँचायझीने करारबद्ध केले आहे. गेल्या मोसमात हार्दिकला 11 तर राशिदला 9 कोटी मिळाले होते. अशा प्रकारे पांड्याला 4 तर रशीदला 6 कोटींचा फायदा झाला आहे. याशिवाय गिल आयपीएल 2021 साठी 1.8 कोटी रुपयांत केकेआरकडून खेळला असून अहमदाबादने त्याचा 7 कोटींमध्ये संघात समावेश केला आहे. याशिवाय हार्दिककडे संघाची कमान देखील दिली जाईल असेही अहवालात म्हटले आहे. पांड्याच्या एकूण टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 147 डावात 2797 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 8 अर्धशतकेही झळकावली असून स्ट्राइक रेट 142 आहे.
दरम्यान, माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. तर इंग्लंडचे माजी फलंदाज विक्रम सोलंकी हे क्रिकेटचे संचालक आहेत. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना मेंटरची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच संघाने आपला कोअर ग्रुप तयार केला आहे. संघ प्रथमच टी-20 लीगमध्ये प्रवेश करत आहे.