IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 साठी खेळाडूंचा लिलाव यंदा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. आयपीएलच्या (IPL) लिलावाला आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या मेगा लिलावासाठी सर्व दहा संघ रणनीती बनवण्यात व्यस्त आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) असे संघ नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत. आणि आता एका अहवालानुसार टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अनेक फ्रँचायझींच्या निशाण्यावर आहे. गेल्या हंगामात खेळलेल्या आठही फ्रँचायझींनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. तर दोन नवीन संघ- लखनौ आणि अहमदाबादने अद्याप आपल्या तीन खेळाडूंची निवड जाहीर केलेली नाही. यावेळीच्या लिलावात भारतीय तसेच दिग्गज विदेशी खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. (IPL 2022: हार्दिक पांड्याला मिळणार अहमदाबाद संघाची कमान, Shreyas Iyer माजी चॅम्पियन फ्रँचायझी लावू शकते दाव)
2018 च्या मध्यात गौतम गंभीरने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोडले तेव्हा श्रेयस अय्यरने नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली. पुढच्या वर्षीही तो संघाचा कर्णधार होता आणि दिल्लीने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. तर पुढील वर्षी आयपीएल 2020 मध्येही दिल्ली संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण गेल्या वर्षी अय्यर ला दुखापत झाली आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्या जागी रिषभ पंतला कमान देण्यात आली, पण युएई येथे झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या भागात अय्यर परतल्यावरही पंतकडे कायम राहिले. अशा स्थितीत श्रेयसने दिल्ली संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता आयपीएल 2022 पूर्वी श्रेयस अय्यरची मागणी खूप वाढली आहे. आणि तो एक-दोन नव्हे तर तीन संघांच्या निशाण्यावर आला आहे. याशिवाय अहमदाबाद किंवा लखनौ टीमही लिलावापूर्वी त्याला ताफ्यात सामील करू शकते.
श्रेयस अय्यरवर लिलावात मोठी बोली लागणार असल्याची मीडिया रिपोर्ट्सने दावे केला आहे. श्रेयस अय्यर आरसीबी, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जच्या निशाण्यावर असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे श्रेयस जिथे जाईल तिथे त्याला कर्णधारपद मिळेल, कारण हे तीनही संघ कर्णधाराच्या शोधात आहेत आणि अय्यर एक पर्याय उपलब्ध करून देतो. यामुळेच आयपील 2022 मध्ये श्रेयस अय्यर खूप महागडा खेळाडू ठरू शकतो.