IPL 2022: हार्दिक पांड्याला मिळणार अहमदाबाद संघाची कमान, Shreyas Iyer माजी चॅम्पियन फ्रँचायझी लावू शकते दाव
हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 साठी नवीन अहमदाबादच्या फ्रँचायझीचा (Ahmedabad Franchise) कर्णधार म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी क्रिकेटपटू, जो मूळचा गुजरातमधील बडोदा येथील आहे, लोकप्रिय टी-20 लीगमध्ये प्रथमच नेतृत्व करेल. हार्दिक इतिहासात प्रथमच त्याच्या राज्याच्या संघाचे नेतृत्व करेल. हार्दिकला मुंबई इंडियन्सने कायम ठेवले नाही. 5 वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन फ्रँचायझीने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरोन पोलार्ड यांना बहुप्रतीक्षित आयपीएल 2022 लिलावापूर्वी रिटेन केले आहे. दरम्यान, अहमदाबाद फ्रँचायझी अफगाणिस्तानचा अष्टपैलू रशीद खान आणि मुंबई इंडियन्सचा माजी विकेटकीपर-फलंदाज ईशान किशन यांनाही करारबद्ध करण्याचा विचार करत आहे. (IPL 2022 Venue: या वेळी आयपीएलचा संपूर्ण हंगाम महाराष्ट्रातच? कोविड-19 स्थिती लक्षात घेत  BCCI प्लॅन ‘बी’च्या विचारात)

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केल्यावर माजी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील दुसऱ्या संघात सामील होण्यास तयार आहे. गेल्या मोसमाच्या सुरुवातीला श्रेयस दुखापतीमुळे बाहेर पडल्यावर रिषभ पंतकडे संघाची कमान देण्यात आली होती. तसेच आगामी हंगामासाठी देखील पंत कर्णधार म्हणून नियुक्ती कायम ठेवली तर अय्यरला बाहेरचा रस्ता दाखवला. आता अय्यर एक मुक्त एजंट आहे, तो अनेक फ्रँचायझींच्या रडारवर आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) अय्यरला संभाव्य कर्णधार म्हणून ताफ्यात सामील करण्यास इच्छुक असलेल्या संघांपैकी एक आहे. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांसारख्या संघांकडे आधीच पर्याय उपलब्ध असताना, KKR च्या विद्यमान रिटेन्शनमधील शक्यता मर्यादित आहेत.

आयपीएल संघाचे नेतृत्व करताना अय्यरच्या पूर्वीच्या अनुभवामुळे नेतृत्वपदासाठी KKR ची पहिली पसंद बनला आहे. दिल्लीने अय्यरच्या नेतृत्वात पहिल्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. आयपीएल 2020 मध्ये 34.60 च्या सरासरीने 519 धावांसह तो चौथा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. दरम्यान कोविड परिस्थिती सुधारल्यास आयपीएलच्या आगामी सीजनसाठी मेगा लिलाव 11-12 फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये होण्याची शक्यता आहे.