श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/DelhiCapitals)

IPL 2021, MI vs DC: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध शारजाह (Sharjah) येथे नुकत्याच झालेल्या 46 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 4 विकेटने खणखणीत विजय मिळवला आहे. मुंबईने दिलेल्या 130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून विजयीरेष ओलांडली. दिल्लीच्या विजयात श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) महत्वाची भूमिका बजावली. दिल्ली कॅपिटल्सचा हा माजी कर्णधार 33 चेंडूत 33 धावा करून नाबाद राहिला. तसेच कर्णधार रिषभ पंतने 26 धावा आणि रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) 14 धावांचे नाबाद योगदान दिले. या विजयासह गतविजेता मुंबईवर आयपीएल प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे. मुंबईचा 12 सामन्यातील सातवा पराभव ठरला आहे. दुसरीकडे, या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबईसाठी जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, आणि नॅथन कुल्टर-नाईल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (IPL 2021 Playoffs Race: पंजाब किंग्जच्या विजयाने दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये, चौथ्या स्थानासाठी तीन दावेदार रिंगणात)

मुंबईने पहिले फलंदाजी करून दिलेल्या माफक धावसंख्येचा प्रत्युत्तरात दिल्लीसाठी शिखर धवन-पृथ्वी शॉची जोडी सलामीला उतरली. दोघे आश्वासक सुरुवात करत असताना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या धवनने किरोन पोलार्डने धावचीत केले. धवनच्या मागे कृणालने पृथ्वी शॉला 6 धावांवर माघारी पाठवले. कुल्टर नाईलने स्टीव्ह स्मिथला 9 धावांवर त्रिफळाचित केलं. कर्णधार पंतने सूत्रे हाती घेत हल्लाबोल केला. त्याने काही मोठे फटके खेळून दबाव हाताळण्याचा प्रयत्न केला. पण या दरम्यान एक चुकीचा शॉट खेळून जयंत यादवच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याकडे झेलबाद झाला. यानंतरही दिल्लीच्या विकेट पडण्याचे सत्र सुरूच राहिले. अक्षर पटेल व शिमरॉन हेटमायर स्वस्तात बाद झाले. मात्र यानंतर श्रेयसने आर अश्विनच्या साथीने डाव सावरला व मुंबईला पराभवाची धूळ चारली.

यापूर्वी. मुंबईची फलंदाजी देखील ढेपाळली. गतविजेता मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर क्विंटन डी कॉकने 19, हार्दिक पांड्याने 17 आणि कृणाल पांड्याने 13 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तसेच दिल्लीसाठी आवेश खान व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत मुंबईच्या अडचणीत वाढ केली. याशिवाय अश्विन व एनरिच नॉर्टजे यांनी मुंबईचा प्रत्येकी 1 गडी बाद केला.