IPL 2021: लसिथ मलिंगाच्या 'या' विक्रमापासून Amit Mishra फक्त 4 विकेट्स दूर, आयपीएलमध्ये इतिहास घडवण्याची संधी
अमित मिश्रा, दिल्ली विरुद्ध मुंबई (Photo Credit: PTI)

IPL 2021: पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडिअन्सचा (Mumbai Indians) यॉर्कर किंग आणि टी-20 क्रिकेटचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) लीग क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे मलिंगा आता आयपीएलमध्ये (IPL) पुन्हा गोलंदाजी करताना दिसणार नाही. श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज मलिंगा भारताच्या या टी-20 लीगमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. 122 आयपीएल सामन्यात 7.14 इकॉनॉमी रेटने 170 विकेट्स घेत मलिंगा आयपीएलमधून बाहेर पडला. पण आता मलिंगचा हा ऑल-टाइम आयपीएल रेकॉर्ड तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) आयपीएलमध्ये आपल्या फिरकीने फलंदाजांच्या अडचणीत वाढ करणारा अमित मिश्रा (Amit Mishra) आता मलिंगाच्या या मोठ्या आयपीएल विक्रमापासून अवघ्या 4 दूर आहे. (IPL 2021: आयपीएलमध्ये ‘या’ 3 खेळाडूंनी चोपल्या सर्वात वेगवान 5000 धावा, कोण आहेत हे खेळाडू वाचा)

अमित मिश्राने आयपीएलच्या 154 सामन्यात एकूण 166 विकेट्स काढल्या असून तो लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मलिंगाच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये आज डबल-हेडरचा थरार रंगणार आहे ज्यामधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची गाठ कोलकाता नाईट रायडर्सशी आहे. त्यामुळे कोलकाताच्या नाईट रायडर्स विरोधात मिश्राला 4 किंवा अधिक विकेट घेऊन आयपीएलमधील इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी आहे. मिश्राने असे केल्यास तो इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी गोलंदाज बनू शकतो. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2021 च्या चकमकीत मुंबई इंडियन्सचा पराभव करण्यात अमित मिश्राने दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठी भूमिका बजावली होती. सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवत 24 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. मिश्राने रोहित शर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या आणि केरॉन पोलार्ड यांना तंबूचा रस्ता दाखवला होता.

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघातील आयपीएलचा 25वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. दिल्ली आपल्या शानदार खेळीच्या जोरावर गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर कोलकाता पाचव्या स्थानावर आहे. दिल्लीने आजवर सहापैकी 5 आयपीएल सामने जिंकले आहेत तर केकेआरला 2 सामन्यात विजय नोंदवता आला आहे. अशास्थितीत नाईट रायडर्ससाठी आजच्या सामन्यात विजय महत्वपूर्ण ठरणार असेल.