IPL 2021: आयपीएलमध्ये ‘या’ 3 खेळाडूंनी चोपल्या सर्वात वेगवान 5000 धावा, कोण आहेत हे खेळाडू वाचा
डेविड वॉर्नर (Photo Credit: IANS)

IPL Fastest 5000 Runs: इंडियन प्रीमियर लीग 2021चा 22वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बेंगलोर संघाने अवघ्या एका धावेने दिल्लीवर मात केली. सामन्यात आरसीबीने पहिले फलंदाजी करून 20 ओव्हरमध्ये 171 धावांपर्यंत मजल मारली ज्याच्या प्रत्युत्तरात दिल्ली संघ 170 धावाच करू शकला. या सामन्यात संघ अडचणीत असताना तडाखेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने 42 चेंडूत नाबाद 75 धावांची अर्धशतकी खेळी करत एक अफलातून विक्रमाची नोंद केली. डिव्हिलियर्स आता आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा सर करणारा तिसरा वेगवान फलंदाज ठरला. आयपीएलच्या इतिहासात आजवर सर्वात वेगवान पाच हजारी धावसंख्येचा पल्ला पार करणाऱ्या फलंदाजांची यादी खालीलप्रमाणे आहे. (AB de Villiers: ए बी डिव्हिलियर्सच्या आयपीएलमधील 5 हजार धावा पूर्ण, अशी कामगिरी करणारा परदेशातील ठरला दुसरा खेळाडू)

1. डेविड वॉर्नर

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार वॉर्नर आयपीएलमध्ये पाच हजारी धावसंख्येचा पल्ला गाठणारा पहिला विदेशी फलंदाज आहे. त्याने मागील वर्षी युएई येथे झालेल्या आयपीएल 2020मध्ये ही अफलातून कामगिरी केली. वॉर्नरने 5 हजार धावा सर्वात वेगवान 135 डावात पूर्ण केल्या आहेत.

2. विराट कोहली

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट या यादीत दुसरे मोठे नाव आहे. विराटने 147 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. विराटने आजवर आयपीएलमध्ये सर्वाधिक 6041 धावा देखील केल्या आहेत.

3. एबी डिव्हिलियर्स

डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये 5000 धावा बनवणारा सहावा फलंदाज ठरला. डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये सर्वात वेगवान पाच हजारी बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला.डिव्हिलियर्सने 161 डावांमध्ये ही कामगिरी केली.

दरम्यान, आयपीएलच्या एलिट यादीत शिखर धवन, सुरेश रैना आणि रोहित शर्मा अशा आणखी तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे यादीत टॉप-3 मध्ये वॉर्नर व विराट अशा दोन आयपीएलमध्ये यशस्वी संघ कर्णधारांचा समावेश आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामी फलंदाज धवनने 168 डावात तर चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैनाने 173 आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने 187 डावात 5000 आयपीएल रन-क्लबमध्ये प्रवेश केला आहे.