IPL 2020: 'राजस्थानविरुद्ध जे केलं त्याला नेतृत्व करणं म्हणत नाही', CSKच्या पराभवानंतर गौतम गंभीरचा एमएस धोनीवर निशाणा
गौतम गंभीर आणि एमएस धोनी (Photo Credit: Getty)

चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) विजयासाठी दिलेल्या 217 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसके कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) खालच्या क्रमवारीत आलेले पाहूनभारताचे माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) आश्चर्यचकित झाले. मंगळवारी शारजा येथे झालेल्या आयपीएल 2020 सामन्यात सीएसकेच्या (CSK) 16 धावांनी झालेल्या पराभवाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आहे. कर्णधार धोनीची रणनिती आणि त्याची फलंदाजीची शैली याला जबाबदार होती अशी चर्चा सध्या सीएसके प्रेमींमध्ये रंगली आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नईवर 16 धावांनी मात करत पहिला विजय नोंदवला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 217 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 200 धावांपर्यंतच मजल मारता आली. 217 धावांचं आव्हान असताना धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, ज्यामुळे चाहते निराश झाले. सॅम कुरन, रुतुराज गायकवाड आणि केदार जाधव यांनी अनुक्रमे 4,5 आणि 6 व्या स्थानावर फलंदाजी केली तर धोनी स्वत: 7व्या स्थानावर फलंदाजीला आला. माजी क्रिकेटपटू गंभीरने धोनीच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करुन टीका केली आहे. (राजस्थान रॉयल विरुद्ध अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी करणारा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोशल मिडियावर अधिक चर्चेत)

गंभीरला वाटले की धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे आणि पुढाकाराने नेतृत्व केले पाहिजे. “मला थोडे आश्चर्य वाटले. एमएस धोनी फलंदाजी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो? आणि [रतूराज] गायकवाडला त्याच्या आधी सॅम कुर्रान पाठवले. मला काही अर्थ वाटत नाही. खरं तर, आपण पुढाकार घेऊन नेतृत्व केले पाहिजे. याला नेतृत्व करणं म्हणत नाही. 217 धावांचा पाठलाग करत असताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन काय उपयोग…खेळ संपला होता. फाफने एकाकी झुंज दिली, गंभीरने ESPNcricinfoला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.”

सामन्याबद्दल बोलायचे तर सीएसकेकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक 37 चेंडूंत 7 षटकारांसह 72 धावा फटकावल्या. धोनी 17 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला. त्याने टॉम कुरनच्या अखेरच्या ओव्हरमध्ये सलग तीन षटकार देखील लगावले. धोनीने आपल्या बचावात म्हटले होते की वाढलेल्या क्वारंटाइन कालावधीमुळे त्याला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि म्हणूनच तो प्रथम फलंदाजीला आला नाही. पण, गंभीरने धोनीच्या सामन्यात विजय मिळवण्याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उठवला.