
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी सत्रात दोन वेळा विजयी कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कर्णधार असेल. टीमचे नवीन कोच ब्रेंडन मॅक्युलम यांनी याची पुष्टी केली. गुरुवारी झालेल्या लिलावादरम्यान कोलकाताने इंग्लंडच्या मर्यादित षटकांचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याला खरेदी केले. त्यावेळी सर्वांना असे वाटत होते की येत्या हंगामात तो संघाचा कर्णधार असेल. पण, मॅक्युलमने कर्णधारावरचा सस्पेन्स संपवत या वृत्तांना नकार दिला. कोलकाताकडून खेळण्यासाठी मॉर्गनला यावेळी संघाने 5.25 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून कडक आव्हान मिळाले. मॅक्युलमने टीमच्या कॅप्टनबद्दल भाष्य करत स्पष्ट केले की दिनेश कार्तिकच संघाचे नेतृत्व करेल आणि मॉर्गनला चौथ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून संघात समाविष्ट केले गेले आहे. (IPL 2020: KXIP ने केली मोठी घोषणा केली, केएल राहुल याची कर्णधारपदी झाली नियुक्ती)
लिलावाच्या पहिल्या ब्रेकमध्ये कोलकाताचे नवे प्रशिक्षक मॅक्युलमने पत्रकारांना सांगितले की, “दिनेश नक्कीच आमचा कर्णधार असेल. आम्हाला नेतृत्व गटात अधिकाधिक अनुभव हवा होता आणि मॉर्गन हा जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे." तो म्हणाला, "तो दिनेशसाठी एक मजबूत कमांडर म्हणून काम करेल आणि नंबर-4 ची कमतरताही भरून काढेल. सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे."
मॉर्गनव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स यालाही कोलकाताने संघात समाविष्ट केले. कोलकाताच्या कमिन्सला रेकॉर्ड 15.50 कोटी रुपयांत संघात सामील केले. कमिन्सशिवाय त्याचा सहकारी ग्लेन मॅक्सवेल यालाही बरीच मोठी रक्कम मिळाली आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला 10.75 कोटी रुपयांत खरेदी केले. मॅक्सवेलने काही दिवसांपूर्वी मानसिक तणावात असल्याचे उघड केले होते आणि त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचेदेखील जाहीर केले होते. पंजाबनेही त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली. रवींचंद्रन अश्विन याला दिल्ली कॅपिटल्ससह ट्रेड केल्यावर पंजाबने भारतीय सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.