IPL 2020 बाबत अनिश्चितता कायम, BCCI ने फ्रँचायझी मालकांसह कॉन्फरन्स कॉल केलं स्थगित
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सतत वाढणाऱ्या परिणामा दरम्यान भारताची प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) आयोजित केल्याबद्दल संभ्रम कायम आहे. या स्पर्धेसंदर्भात मंगळवारी बीसीसीआय (BCCI) आणि आठही फ्रँचायझीच्या मालकांमधील परिषद कॉल रद्द झाल्यानंतर यंदा आयपीएल होणार नाही यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहे. तथापि, संघ मालकांना यात कोणतीही अडचण नाही. यापूर्वी 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली. कोविड-19 (COVID-19) चा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील प्रसिद्ध टी-20 लीग प्राणघातक व्हायरसच्या उद्रेकामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. या व्हायरसमुळे जगभरात 16,000 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात आजवर 400 हुन अधिक कोरोनाचे रुग्ण समोर आले असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. (कोरोना व्हायरसमुळे IPL नंतर CPL देखील होणार स्थगित? आयोजकांनी जाहीर केले निवेदन)

पीटीआयशी बोलताना आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब (केएक्सआयपी) फ्रँचायझीचे मालक नेस वाडिया म्हणाले की,“मानवता प्रथम आहे, बाकी सर्व नंतर येते. जर परिस्थिती सुधारली नाही तर त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. आयपीएलचे आयोजन नाही झाले तरी ठीक." पंजाब संघाचे सह-मालक पुढे म्हणाले, “यावेळी मी आयपीएलचा विचारही करू शकत नाही. जे घडत आहे त्यामध्ये याचा काहीच अर्थ नाही. सध्या जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे आपण जिवंत आहोत आणि तिसर्‍या महायुद्धाच्या परिस्थितीत आहोत जिथे आपण लोकांचे प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करीत आहोत."

दरम्यान भारत सरकारच्या निर्देशानुसार जवळपास सर्व गाड्या, बसेस तसेच सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. आणि संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. अशा स्थितीत, क्रीडा स्पर्धा प्राधान्य नाहीत. आयपीएल ही एकमेव स्पर्धा नाही जी कोरोनामुळे रद्द करावी लागू शकते. जपानमधील ऑलिम्पिक खेळही रद्द होण्याच्या स्थितीत आहेत.