KL Rahul: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 8 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचे फलंदाज लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले त्यानंतर केएल राहुलने (KL Rahul) डावाची धुरा सांभाळली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केएल राहुल 70 धावा करून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून स्टार गोलंदाज कागिसो रबाडाने 5 बळी घेतले. (हे देखील वाचा: IND vs SA 1st Test Day 2 Live Score Update: टीम इंडियाचा पहिला डाव 245 धावांवर मर्यादित, केएल राहुलने झळकावले शतक; कागिसो रबाडाची घातक गोलंदाजी)
केएल राहुलचा दक्षिण आफ्रिकेत मोठा पराक्रम
सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत केएल राहुल वगळता सर्व भारतीय फलंदाजांनी मौन बाळगले. एकाही फलंदाजाला क्रीजवर जास्त वेळ घालवता आला नाही. पण केएल राहुल एका टोकापासून डावावर नियंत्रण ठेवले. दरम्यान, केएल राहुलने सामन्याच्या पहिल्याच दिवशी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. केएल राहुलपूर्वी केवळ दोन भारतीय फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती.
या विशेष क्लबमध्ये झाला सामील
टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल पहिल्यांदाच कसोटीत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. याआधी केएल राहुल एकदिवसीय आणि टी-20 मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळला आहे. यासह, केएल राहुल तिन्ही फॉरमॅटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारताबाहेर 50+ धावांची इनिंग खेळणारा तिसरा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. याआधी केवळ महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत यांनाच ही अनोखी कामगिरी करता आली.
टीम इंडियाचे हे स्टार फलंदाज ठरले फ्लॉप
टीम इंडियाच्या पहिल्या डावात केएल राहुलशिवाय भारताचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा 5 धावा करून तर यशस्वी जैस्वाल 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर शुभमन गिलही 2 धावा करून बाद झाला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना चांगली सुरुवात झाली पण त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. विराट कोहलीने 38 धावा केल्यानंतर आणि श्रेयस अय्यरने 31 धावा केल्यानंतर विकेट गमावली.