भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलियाच्या (Australia) दौऱ्यावर आहे. भारतीय खेळाडू सिडनी (Sydney) मध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, तिथे शनिवारी (14 नोव्हेंबर) विमान अपघात (Plane Crashes) झाला. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलपासून सुमारे 30 कि.मी. अंतरावर एक विमान कोसळले, त्यामुळे हॉटेलमध्ये राहत असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जेव्हा विमान क्रॅश होऊन ते खाली एका मैदानाजवळ आले तेव्हा मैदानात क्रिकेट आणि फुटबॉल सामने खेळले जात होते. विमान त्यांच्या दिशेने खाली येताना पाहून खेळाडू घाबरुन पळू लागले.
ऑलिम्पिक पार्क हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंसोबत स्थानिक क्रिकेटपटू व काही फुटबॉलपटू देखील थांबले आहेत. क्रॉमर पार्क या ठिकाणी विमान अपघाताची नोंद झाली आहे. सध्या हे खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहेत व या अपघातामुळे प्रत्येकाच्याच मनात भीती निर्माण झाली आहे. जेव्हा विमान जमिनीवर कोसळले तेव्हा येथे क्रिकेट आणि फुटबॉल सामने खेळले जात होते. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी लोक एकत्रित आले होते त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर हा क्रॅश झाला. विमान आपल्या दिशेने येत आहे हे पाहता खेळाडूंनी इतरत्र पळून स्वतःचा जीव वाचविला. (हेही वाचा: ‘विराट कोहलीचा द्वेष करायला आवडतं, पण फॅन म्हणून त्याची फलंदाजी आवडते’, ऑस्ट्रेलियाई कर्णधार टिम पेनचे विधान)
मिळालेल्या माहितीनुसार हे विमान एका फ्लाइंग स्कूलचे होते जे इंजिनच्या बिघाडामुळे क्रॅश झाले. जखमी झाल्यानंतरही विमानात असलेले दोन लोक सुरक्षित आहेत. दरम्यान, 10 नोव्हेंबरला इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ दुबईहून सिडनीला रवाना झाला. या संघाला सध्या 14 दिवस वेगळे ठेवण्यात आले असून, 27 नोव्हेंबरला एकदिवसीय सामने सुरु होणार आहेत.