IND vs PAK Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 च्या चौथ्या सामन्यात भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan), हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आले आहे. बे ओव्हल येथे पाकिस्तान विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 7 गडी गमावून 244 धावसंख्येपर्यंत मजल मारली. एक वेळ अशी होती की टीम इंडियाने (Team India) 114 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी संपूर्ण संघ 150 धावांत पॅव्हिलियनमध्ये जाईल असे वाटत होते, पण त्यानंतर आपल्या पहिल्या वर्ल्ड कप सामन्यात फलंदाजीला आलेल्या स्नेह राणा (Sneh Rana) आणि पूजा वस्त्रकर (Pooja Vastrakar) यांनी संघाची नौका पार लावली व संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. राणा आणि वस्त्रकर यांनी 122 धावांची विश्वविक्रमी भागीदारी करत पाकिस्तानसमोर 245 धावांचे आव्हान ठेवले. (IND vs PAK Women's World Cup 2022: पाकिस्तानची पहिली विकेट पाडण्यात राजेश्वरी गायकवाडला यश, पहा स्कोर)
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. शेफाली वर्मा खाते न उघडताच पॅव्हिलियनमध्ये परतली. यानंतर दीप्ती शर्मा फलंदाजीला आली आणि स्मृती मंधाना सोबत सोबत तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पण दीप्ती बाद होताच संघाचा फलंदाजी क्रम पत्त्यासारखा विखुरला. भारताला दुसरा धक्का 96 च्या धावसंख्येवर बसला आणि भारताने अवघ्या 114 धावसंख्येचा 6 विकेट गमावल्या. मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनी अवघ्या 18 धावांत पॅव्हिलियनची वाट धरली. तथापि यानंतर स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांनी 7 व्या विकेटसाठी 122 धावांची विक्रमी भागीदारी करत भारताला मोठ्या धाव संख्येपर्यंत नेले. उल्लेखनीय आहे की 7 व्या विकेटसाठी महिला वनडे क्रिकेटमधील ही सर्वोत्कृष्ट भागीदारी आहे.
दोघींनी पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि चौकारांची बरसात केली. पूजा 8 चौकारांसह 67 धावा करून बाद झाली, पण स्नेह राणा शेवटपर्यंत नाबाद राहिली. स्नेहने 48 चेंडूंत 4 चौकारांसह 53 धावांची नाबाद खेळी खेळली. यापूर्वी दीप्ती शर्माने 40 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले तर मंधानाने 52 धावांची खेळी केली. अशा परिस्थितीत आता फलंदाजीनंतर भारताची मदार गोलंदाजांवर असेल.