IND-W vs PAK-W, Women's World Cup 2022: न्यूझीलंड (New Zealand) येथे 4 मार्चपासून आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) स्पर्धेची सुरुवात झाली आहे. तर 6 मार्च रोजी मिताली राजच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) मोहिमेची सुरुवात करेल. महिला संघ असो की पुरुष संघ भारत आणि पाकिस्तान जेव्हा-जेव्हा मैदानात आमनेसामने येतात तेव्हा त्यांच्यात फक्त हाय-व्होल्टेज टक्कर पाहायला मिळते. आणि यावेळी देखील असेच काहीसे पहिला मिळणे अपेक्षित आहे. भारतीय महिलांचा पाकिस्तानविरुद्ध रेकॉर्ड एकदम साफ आहे. विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ दोन वेळा खेळले आहेत आणि दोन्ही प्रसंगी भारताने विजय मिळवला आहे. याशिवाय एकूण संघांनी 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि टीम इंडियाने सर्व 10 सामने जिंकले आहेत. (Women's World Cup 2022: मिताली राज विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर, विश्वचषक स्पर्धेच्या सर्वात मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यापासून ‘इतक्या’ धावा दूर)
भारताच्या पुरुष संघाप्रमाणेच एकदिवसीय विश्वचषक आणि सामन्यांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवर वरचष्मा राहिला आहे. अशा परिस्थितीत मिताली राजच्या नेतृत्वातील संघाला स्पर्धेपूर्वी मोठा फायदा आहे. तथापि पाकिस्तानने गेल्या दोन वर्षांत उल्लेखनीय सुधारणा दाखवली आहे. बिस्माह मारूफ हिच्या सक्षम नेतृत्वात संघाने एक युनिट म्हणून चांगला खेळ केला आहे. पाकिस्तानने एका सराव सामन्यात न्यूझीलंडचाही पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघ यावेळी पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक करू शकत नाही. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध सराव सामने भारताने जिंकले आहेत.
इंग्लंडमधील विश्वचषक 2017 दरम्यान दोन्ही संघ शेवटी आमनेसामने आले होते. यादरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला केवळ 74 धावांत गारद करून विजयाची हॅटट्रिक साजरी केली होती. भारताने आशिया चषकमध्ये 6 वेळा, विश्वचषक स्पर्धेत 3 आणि विश्वचषक पात्रता फेरीत एकदा पाकिस्तानला पराभूत केले आहे. त्यामुळे यावेळी महिला विश्वचषकात भारताने पाकिस्तानला परभची धूळ चारली तर हा त्यांचा 11 वा विजय ठरेल.