Women's World Cup 2022: मिताली राज विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर, विश्वचषक स्पर्धेच्या सर्वात मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यापासून ‘इतक्या’ धावा दूर 
भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज (Photo Credit: Facebook)

Women's World Cup 2022: यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याने महिला विश्वचषक स्पर्धेची शानदार सुरुवात झाली आहे. तर 2017 अंतिम सामन्यात पराभव पत्करलेला भारतीय संघ (Indian Team) 6 मार्च रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंड येथे आयोजित यंदाचा एकदिवसीय विश्वचषक दिग्गज भारतीय कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेतलेली झुलन गोस्वामी यांचा अखेरचा ठरणार आहे. म्हणजेच यानंतर भारत महिला क्रिकेटच्या या दोघी दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतात. त्यामुळे भारतीय संघ यंदा जेतेपद जिंकून या दोन खेळाडूंना विजयी निरोप देऊ इच्छित असेल. तसेच या स्पर्धेत मिताली राज विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा विक्रम आपले नावे करू शकते. (Womens World Cup 2022: विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानशी भिडणार Women In Blue, जाणून घ्या टीम इंडियाचे पूर्ण Schedule)

मितालीने वर्ष 2000 मध्ये पहिला वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने आतापर्यंत 31 विश्वचषक सामने खेळले आहेत आणि 1139 धावा केल्या आहेत. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मिताली सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडच्या डेबी हॉकली यांच्या नावावर स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. हॉकली यांनी 45 विश्वचषक सामन्यात एकूण 1501 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत आपल्या शेवटच्या वर्ल्ड कप स्पर्धेत मिताली हॉकली यांचा हा रेकॉर्ड मोडून नंबर 1 चे सिंहासन काबीज करण्यापासून 363 धावांची गरज आहे. टीम इंडिया या स्पर्धेत एकूण सात सामने खेळणार आहे, त्यामुळे मितालीला हॉकली यांचा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी चांगली संधी आहे.

दुसरीकडे, इंग्लंडच्या जेनेट ब्रिटिन 36 सामन्यात 1299 धावा करून एलिट यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत, तर इंग्लंडच्या 2009 मध्ये विश्वचषक आणि वर्ल्ड टी-20 दुहेरी शार्लोट एडवर्ड्स 30 सामन्यात 1231 धावांसह तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज बेलिंडा क्लार्क 29 1151 धावा करून चौथ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी सहा वेळा विश्वचषक जिंकला आहे, पुरुष किंवा महिलांच्या बाबतीत हा एक विक्रम आहे. तसेच इंग्लंडने चार वेळा विश्वचषक जिंकला आहे आणि ते सध्याचे गतविजेते आहेत.