टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs WI Series 2022: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात 6 फेब्रुवारीपासून मर्यादित षटकांची मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका फेब्रुवारीच्या पूर्वार्धात अहमदाबाद आणि कोलकाता येथे खेळवली जाईल. यासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होणार आहे. नवनियुक्त कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन निश्चित आहे. तर या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. विंडीजविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाचा मॅच-विनर अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियात (Team India) पुनरागमन करू शकतो. हार्दिक पुन्हा फिटनेस मिळवण्याच्या जवळ आहे. टी-20 विश्वचषक 2021 नंतर हार्दिक पांड्याला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. या स्पर्धेत तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता आणि गोलंदाजीही करू शकत नव्हता. या वृत्तानंतर त्याने स्वत:ला निवडीसाठी अनुपलब्ध असल्याचे सांगितले. (IND vs WI Series 2022: टीम इंडियात 6 वर्षांनंतर होणार ‘या’ स्टार फलंदाजाचे आगमन, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उभारला आहे धावांचा डोंगर)

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार हार्दिकला पूर्णपणे गोलंदाजी करता येईल की नाही हे अद्याप ठरलेले नाही, मात्र तो नेटमध्ये गोलंदाजी करत आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत व्यंकटेश अय्यरकडे अनुभवाची कमतरता होती. संघाला हार्दिक पांड्याची उणीव भासल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने मान्य केले होते. अशा परिस्थितीत हार्दिक वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियात पुनरागमन करू शकतो, एका सूत्राचा हवाला देत पीटीआयने लिहिले. यावर्षा अखेरीस ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्वचषक आणि पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने हार्दिक टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा असेल. तो एक जबरदस्त फिनिशर असून सहाव्या गोलंदाजाची भूमिकाही तो चांगल्या प्रकारे पार पाडतो.

दुसरीकडे, विंडीजविरुद्ध मालिकेसाठी दुखापतीतून सावरलेला ज्येष्ठ अष्टपैलू रवींद्र जडेजा देखील संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. हार्दिकसोबतच जडेजा देखील भारताच्या खालच्या मधल्या फळीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर फिनिशरची जबाबदारी या दोघांवर आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेसाठी संघात मोठे बदल केले जाऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली आहे. त्यामुळे या ठिकाणी अन्य खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.