IND vs WI: ड्रेसिंग रूममधून रोहित शर्मा याची मुलगी समायरासोबत मस्ती, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, पाहा
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/mipaltan)

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात खेळल्या जाणार्‍या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना भारताने जिंकून मालिका जिंकली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी प्रभावी खेळी केली आणि भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात भारतीय संघासाठी (Indian Team) सर्वात मोठा दिलासा म्हणजे शेवटच्या दोन सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याची फलंदाजी. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात रोहित फलंदाजीत काही खास कामगिरी करू शकला नाही आणि अपयशी राहिला. पण, तिसऱ्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना रोहित लयीत दिसला. रोहितने वानखेडेमधील त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही आणि शानदार खेळी केली. भारतीय संघाचा सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित मोठ्या अपेक्षेसह सामन्यासाठी मैदानात उतरला. (IND vs WI 2nd T20I: रोहित शर्मा याने नोंदवला 'षटकारांचा' महा रेकॉर्ड, ‘हा’ पराक्रम करणारा बनला पहिला भारतीय)

केएल राहुल याच्याबरोबर सलामीला आलेल्या रोहितने पहिल्याच चेंडूवर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरवात केली. यानंतर रोहित आणि राहुलने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची जणू क्लासच घेतली. रोहितने 34  चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. रोहितच्या लयसाठी त्याचे कुटुंब आकर्षक ठरले. मुंबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोहितची पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा स्टँडच्या दुसर्‍या टप्प्यावर उपस्थित होत्या. सामन्यात एक सुंदर दृश्य पाहायला मिळाले, जेव्हा रोहित पहिल्या टियरपासून दुसऱ्या टियरपर्यंत आपली मुलगी समायरा (Samaira) कडे पाहत मस्ती करत होता. रोहितची आयपीएल (IPL) फ्रँचायसी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) या सुंदर दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही खूप आनंद होईल. पाहा हा व्हिडिओ:

विंडीजविरुद्ध वानखेडे सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने मालिका 2-1 ने जिंकली. यानंतर आता दोन्ही संघाचा सामना 15 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेवर असेल. यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. रोहितचा सलामी जोडीदार शिखर धवन याला दुखापत झाली असल्याने ती पूर्णपणे बारी होण्यासाठी अजून काळ लागणार असल्या कारणाने त्याच्या जागी भारतीय संघात मयंक अग्रवाल याचा समावेश करण्यात आला आहे. विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत जर मयंकचा प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश झाला तर तो पहिला आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळेल.