IND vs WI 2nd ODI: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या रेसमध्ये सामिल झाला हा वेस्ट इंडियन फलंदाज, 2019 चा किंग बनण्यासाठी देतोय कठीण लढत
रोहित शर्मा, विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये दुसरा वनडे सामना खेळण्यास सज्ज होत आहे. चेन्नईतील वनडे सामना विंडीजने 8 विकेटने जिंकत मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली. त्यामुळे, दुसरा सामना जिंकत विंडीज मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल, तर टीम इंडिया मालिकेत आव्हान कायम ठेण्यासाठी सर्वोपरीने प्रयत्न करतील. टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज वर्ष 2019 ची शेवटची वनडे मालिका खेळत आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या खेळाडूंमध्ये एकमेकांना मागे टाकण्याची स्पर्धा पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा समावेश आहे. आणि या स्पर्धेत पुढे येत विंडीज फलंदाज शाई होप (Shai Hope) एक जबरदस्त आव्हान सादर करत आहे. आणि तो रोहित आणि कोहलीला मागे टाकू शकतो आणि यावर्षी सर्वाधिक धावा बनवण्याच्या बाबतीतही पुढे जाऊ शकतो. चेन्नईत खेळल्या जाणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजच्या सलामी फलंदाज होपाने शानदार शतकी खेळी करत भारताचा पराभव निश्चित केला. 151 चेंडूत 102 धावांची नाबाद खेळी करत होपने वेस्ट इंडिजला 8 गडी राखून विजय मिळवून दिला. होपच्या शतकी डावाने कोहली आणि रोहितच्या अडचणी वाढवल्या आहेत. (IND vs WI 2019: पहिल्या वनडे मॅचमधील धीम्या खेळीचा वेस्ट इंडिजला फटका, स्लो ओव्हर रेटसाठी ICC ने ठोकला 80 टक्के दंड)

वर्ष 2019 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली पहिल्या तर रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईतील शतकी खेळीच्या जोरावर होपने ऑस्ट्रेलियाई कर्णधार आरोन फिंच याला पछाडत तिसरे स्थान मिळवले आहे. कोहली आणि रोहितमध्ये केवळ 24 धावांचा फरक आहे, तर होप आणि रोहितमध्ये फक्त 43 धावांचा फरक आहे. तर होप कोहलीच्या फक्त 67 धावा मागे आहे. यावर्षी आजवर कोहलीने 24 वनडे सामन्यात 61 च्या सरासरीने 1292 धावा केल्या आहेत. रोहितने 26 वनडे सामने खेळत एकूण 1268 धावा आणि होपने 26 वनडे सामन्यांमध्ये 1225 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे, वर्षाच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये केवळ कोहली आणि रोहितच नव्हे तर होपदेखील या शर्यतीत या दोघांना नमवून 2019 चे अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.

भारत-वेस्ट इंडिजमध्ये 18 डिसेंबरला दुसरा तर 22 डिसेंबरला तिसरा आणि अंतिम वनडे सामना खेळला जाईल. यानंतर या तिघांपैकी ही शर्यत कोण जिंकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विराटने यापूर्वी 2011, 2017 आणि 2018 वर्षी सर्वाधिक धावा केल्या होत्या. जर कोहली वर्षअखेरीस अव्वल स्थानी राहिला तर तो सर्वाधिक चौथ्यांदा, तर सलग तिसऱ्यांदा पहिले स्थान मिळवेल. वनडे इतिहासातील इतर कोणताही खेळाडू विश्व क्रिकेटमध्ये एका वर्षात 3 पेक्षा जास्त वेळा सर्वाधिक धावा करू शकलेला नाही.