IND vs WI 2019: पहिल्या वनडे मॅचमधील धीम्या खेळीचा वेस्ट इंडिजला फटका, स्लो ओव्हर रेटसाठी ICC ने ठोकला 80 टक्के दंड
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (Photo Credit: IANS)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेस्ट इंडीज (West Indies) च्या खेळाडूंना भारता (India) विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यादरम्यान स्लोव ओव्हर रेटसाठी 80 टक्के दंड आकारला आहे. आयसीसी एलिट पॅनेलचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याच्या संघाला दंड ठोठावला आहे. लक्ष्य वेळेपेक्षा चार ओव्हर कमी फेकल्याचा आरोप कॅरिबियन संघावर आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की सामना संपल्यानंतर वेस्ट इंडीज टीमकडे चार ओव्हर शिल्लक होते. आयसीसीच्या खेळाडू व सहाय्यक कर्मचार्‍यांच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार संघाने निर्धारित वेळेत ओव्हर पूर्ण न केल्यास खेळाडूंना त्यांच्या प्रति सामन्यापैकी 20 टक्के दंड आकारला जातो. अशा प्रकारे त्याच्या प्रत्येक खेळाडूला सामना शुल्काच्या 80 टक्के दंड ठोठावण्यात आला. हा कलम स्लो ओव्हर रेटशी संबंधित आहे. (IND vs WI 1st ODI: चेन्नई वनडेमध्ये शिमरोन हेटमेयर-शाई होप ची तुफान बॅटिंग; वेस्ट इंडिजचा भारतावर 8 विकेटने विजय)

पोलार्डने सामन्यानंतर आपली चूक कबूल केली जेणेकरुन औपचारिक सुनावणीची गरज भासू नये. मैदानावरील अंपायर नितीन मेनन आणि शॉन जॉर्ज, थर्ड अंपायर रॉडने टकर आणि फोर्थ अंपायर अनिल चौधरी यांनी या आरोपावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियममध्ये झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडीजने आठ विकेट्सने विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

विंडीजने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला भारतीय संघाच्या तीन फलंदाजांना बाद करत दबाव आणला. पण, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीने संघाचा डाव सावरला आणि मोठा स्कोर करण्यास महत्वाची भूमिका बजावली. शिवाय केदार जाधव यानेही 40 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाने दिलेल्या 288 धावांचे लक्ष्य विंडीजने सहज फलंदाजीने गाठले. शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) आणि शाई होप यांनी शतकी खेळी करत संघाचा विजय निश्चित केला आणि मालिकेत आघाडी मिळवून दिली.