
IND vs SL Series 2022: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात टी-20 आणि कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दोन्ही संघात खेळली जाणाऱ्या या मालिकेची सुरुवात कसोटी मालिकेने बेंगलोर (Bangalore) येथे होणार होती. तथापि पाहुण्या संघाच्या विनंतीनंतर मूळ वेळापत्रकात बदल करून आता श्रीलंकेविरुद्ध मालिकेची सुरुवात आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेने होईल. श्रीलंकन क्रिकेटने (Sri Lanka Cricket) यापूर्वी BCCI ला त्यांच्या टी-20 संघाच्या सुरळीत बबल-टू-बबल हस्तांतरणासाठी कसोटी सामन्यांपूर्वी टी-20 मालिका खेळण्याची विनंती केली होती. भारत दौऱ्यापूर्वी श्रीलंका संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour) पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. (Sunil Gavaskar यांचा दावा,म्हणाले - ‘श्रीलंकेविरुद्ध मालिकेतून होणार चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची सुट्टी’)
मालिकेच्या तारखांमध्ये अजूनही बदल केले जात आहेत, परंतु बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेटच्या विनंतीस सहमती दर्शविली आहे, असे ESPNcricinfo च्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान तारखांमध्ये बदल झाल्यामुळे आता विराट कोहली बेंगलोरमध्ये त्याची 100 वी कसोटी खेळणार नाही. विराट दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी मालिकेदरम्यान 100 वी टेस्ट मॅच खेळणे अपेक्षित होते मात्र तो दुसऱ्या सामन्याला मुकल्याने त्याच्या या खास क्षणाची प्रतीक्षा आणखी वाढली. श्रीलंकाविरुद्ध पहिली कसोटी आता मोहालीमध्ये खेळली जाईल, तर एम चिन्नास्वामी स्टेडियम, जिथे आता फ्लड लाइट्स अपग्रेड केले आहेत, दिवस/रात्र कसोटी सामन्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे, संघ अंतिम सामन्यासाठी मोहालीला जाण्यापूर्वी धर्मशाला पहिल्या दोन टी-20 सामन्यासह दौरा सुरू करण्याची शक्यता आहे.
हिवाळ्यात उत्तर भारतात धुके आणि मुसळधार दव असल्यामुळे मोहाली येथे दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यास बोर्ड नाखूष असल्याचे समजले आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यानुसार बदलाचे आणखी एक कारण म्हणजे बेंगलोर कोलंबोला थेट कनेक्टिव्हिटी देते, ज्यामुळे श्रीलंकेला विनाथांबता घरी परतीचा प्रवास करता येईल. लक्षात घ्यायचे की बीसीसीआयने आत्तापर्यंत भारतात फक्त दोनच गुलाबी चेंडूचे कसोटी सामने आयोजित केले आहेत. भारताने पहिला दिवस/रात्र सामना 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला तर गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळला. आणि भारताने हे दोन्ही सामने जिंकले आहेत.