IND vs SL: ऋषभ पंत याच्याबद्दल दिनेश कार्तिकचे धक्कादायक वक्तव्य, म्हणाला - ‘MS Dhoni सारख्या महान खेळाडूंच्या लीगमध्ये सामील होईल’
ऋषभ पंत (Photo Credit: PTI)

बंगळुरूच्या (Bangalore) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सृऊ असलेल्या दिवस/रात्र कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 50 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर अनुभवी यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) युवा विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याचे प्रचंड कौतुक केले. पंतने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतासाठी 28 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला. त्याने भारताचा दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा दीर्घकालीन विक्रम मोडला. देव यांनी 1982 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कराची येथे 30 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. कार्तिकने पंतची कौतुकाने पाठ थोपटली आणि भाकीत केले की तो महान महेंद्र सिंह धोनीसह (Mahendra Singh Dhoni) भारताचा सर्वात महान यष्टिरक्षक बनेल. पंतने श्रेयस अय्यर याच्या साथीने भारताला दुसऱ्या डावात 300 च्या पुढे धावसंख्या गाठण्यात निर्णायक भूमिका बजावली. (IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंका गोलंदाजांचा समाचार घेत Rishabh Pant याने इतिहास रचला, बनला सर्वात जलद टेस्ट अर्धशतक ठोकणारा भारतीय फलंदाज)

पंतच्या खेळी आणि खेळण्याच्या शैलीचे सहकारी विकेटकीपर दिनेश कार्तिकने खूप कौतुक केले. कार्तिकने सुचवले की जर पंत दीर्घकाळ यष्टिरक्षक म्हणून खेळत राहिला तर तो एमएस धोनीसारख्या महान खेळाडूंच्या लीगमध्ये सामील होईल. क्रिकबझवर बोलताना कार्तिक म्हणाला, “तुम्हाला म्हणायचे आहे की ऋषभ पंत महानतेच्या मार्गावर आहे. मला वाटते की जर त्याच्याकडे भारतासाठी पूर्ण विकेटकीपिंग कारकीर्द असेल तर तो एमएस धोनी सोबत महान खेळाडूंपैकी एक होईल. हे दोघे भारताचे महान यष्टिरक्षक म्हणून उभे राहतील.” पंतने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत चौथे टेस्ट शतक झळकावले आणि मोहालीतील पहिल्या कसोटीत तो 90 धावसंख्येवर 5व्यांदा बाद झाला.

बेंगलोर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चहापानानंतरच्या सत्रात भारताने हनुमा विहारी याची विकेट गमावल्यानंतर 24 वर्षीय फलंदाजीसाठी बाहेर पडला. विराट कोहली बाद झाल्यानंतर पंतने अय्यरच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. आपल्या झंझावाती खेळी पंतने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकून कसोटी क्रिकेटमधील 9वे अर्धशतक ठोकले. दुसरीकडे, पंतच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनाविषयी बोलताना कार्तिक म्हणाला की, त्याला भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची आठवण करून देतो ज्याच्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये सहजतेने चौकार मारण्याची क्षमता होती.