IND vs SL 1st T20I: पहिल्याच सामन्यात श्रीलंकेची शरणागती, भारताच्या विजयाचा सिलसिला सुरूच; मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st T20I: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team) आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला आणि लखनऊ (Lucknow) येथील पहिल्या टी-20 सामन्यात एकहाती वर्चस्व राखून श्रीलंकेचा (Sri Lanka) 62 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने (Team India) सामन्यात नाणेफेक गमावून दमदार फलंदाजीच्या जोरावर 199 धावांचा डोंगर उभारला आणि पाहुण्या संघाला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात फलंदाजांनी चोपल्यानंतर गोलंदाजांनी संघाचा खेळ खराब केला आणि त्यांना षटकांत 137/6 धावांत रोखले. पाहुण्या संघासाठी चरिथ असलंका (Charith Asalanka) याने सर्वाधिक 53 धावा केल्या तर चमिका करुणारत्ने 21 धावांचे योगदान दिले. तसेच दुष्मंथ चमीरा 24 धावा करून नाबाद परतला. परिणामी संघाला लज्जास्पद पराभवाचे तोंड पाहायला लागले. दरम्यान या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आणि टी-20 इतिहासात आपला सलग 10 वा विजय मिळवला. (IND vs SL 1st T20I: ‘हिटमॅन’ Rohit Sharma याची दमदार फलंदाजी; विराट कोहली, मार्टिन गप्टिल यांना एकत्र ओव्हरटेक करून बनला टी-20 क्रिकेटचा ‘किंग’)

लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या पहिल्या सामन्यात पाहुणा कर्णधार दसुन शनाकाने नाणेफेक जिंकली आणि भारताला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. पण तो निर्णय सांघाच्याच अंगी उलटला. सामन्यात सहा बदल करून मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने बॅटने संपूर्ण वर्चस्व गाजवले आणि श्रीलंकाई गोलंदाजांची शाळा घेतली. ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्माने शतकी भागीदारी करून संघाला जोरदार सुरुवात करून दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या आणखी एका टी-20 अर्धशतकानजीक पोहचला असताना रोहित शर्माने 32 चेंडूत 44 धावांत आपली विकेट गमावली. रोहित बाद झाल्यावर देखील किशन झटपट फलंदाजी करत राहिला, पण किशन अखेर 56 चेंडूत 89 धावा करून माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यरने मनानं हाती घेत संघाला धावांचा डोंगर उभारला.

प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेला श्रीलंका संघातील आघाडीच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे अक्षरशः शरणागती पत्करली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर युजवेंद्र चहलने एक गडी बाद केला. असलंका आणि दुष्मंथा चमीरा यांनी श्रीलंकेसाठी लढा देण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना शनिवार, 26 फेब्रुवारी रोजी धर्मशालाच्या HPCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.