अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

IND vs SA Test 2021-22: सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्कमध्ये भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिल्या सामन्याने कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या सामन्यात कसोटी कर्णधार विराट कोहली खराब फॉर्मशी झगडत असलेल्या अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) संधी देतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नुकताच भारताच्या ‘अ’ संघासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या कसोटी विशेषज्ञ हनुमा विहारी (Hanuma Vihari) विरुद्ध रहाणे अशी खडतर स्पर्धा पाहायला मिळत आहे. रहाणेकडून उपकर्णधारपद काढून घेतल्याने त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान अनिश्चित मानले जात आहे. मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताचा स्थायी कर्णधार असलेला रहाणेने अनुक्रमे 35 आणि 4 धावा केल्या, तर हॅमस्ट्रिंगमुळे मुंबईतील दुसऱ्या सामन्यात तो खेळू सकळ नाही. मुंबईकर फलंदाजाने 12 सामन्यात 19.57 च्या सरासरीने 2021 मध्ये फक्त दोन अर्धशतकांसह 411 धावा केल्या. (IND vs SA: टीम इंडिया समोर खूप मोठा पेच, ‘या’ त्रिमूर्तीने वाढवली डोकेदुखी; कोण खेळणार , कोणाची होणार सुट्टी? वाचा सविस्तर)

दुसरीकडे, विहारी भारतात खेळल्या गेलेल्या न्यूझीलंड कसोटी मालिकेचा भाग नव्हता. तो ‘अ’ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. त्याने दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध अनुक्रमे 54, नाबाद 72 आणि 63 धावा करत तीन अर्धशतके झळकावली. तथापि, रहाणेला आपली क्षमता सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळू शकते. कोहली हा आक्रमक कर्णधार मानला जातो आणि पहिल्या कसोटीत एक फलंदाज कमी अशा पाच गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीचा उत्तम पर्याय आहे, पण त्याच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे. सध्याच्या संघात चार गोलंदाजांची जागा जवळपास निश्चित झाली आहे ज्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. याशिवाय सध्याच्या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज इशांत शर्माचा फॉर्म लक्षात घेता सिराजच्या जागी त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

दुसरीकडे, श्रेयस अय्यरने आपल्या पदार्पणाच्या मालिकेत दोन्ही हातांनी संधी साधली आणि विहारीने दक्षिण आफ्रिकेत भारत अ संघासाठी चांगली कामगिरी केल्यामुळे, संघ व्यवस्थापन पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनच्या निवडीच्या बाबतीत कठोर निर्णय घेऊ शकतात. तीन सामन्यांच्या मालिकेची सुरुवात सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे बॉक्सिंग डे कसोटीने मालिकेची सुरुवात होईल.