भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील (India Tour of South Africa) पहिल्या कसोटीला आता फक्त पाच दिवस शिल्लक राहिला आहेत. यापूर्वी, टीम इंडियासमोर (Team India) सर्वात मोठी समस्या प्लेइंग इलेव्हन कॉम्बिनेशनची असेल. आतापर्यंत सहा फलंदाज आणि पाच गोलंदाजांसह पाच परदेशी कसोटी मालिकेसाठी दाखल झाले आहेत. मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत ही जोडी कायम राखणे भारतासाठी फार कठीण जाईल. समस्या अशी आहे की चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे तिघेही आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाहीत. अशा स्थितीत मधल्या फळीतील फलंदाजीसोबतच सांघिक संयोजनही अत्यंत काळजीपूर्वक करावे लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्याच्या तयारीत असलेल्या टीम इंडियाची तीन खेळाडूंनी नक्कीच डोकेदुखी वाढवली असेल. (IND vs SA 1st Test: भारत-दक्षिण आफ्रिका बॉक्सिंग डे कसोटीत प्रेक्षकांना ‘नो एन्ट्री’, जाणून घ्या काय आहे कारण
)
श्रेयस अय्यर
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत श्रेयस अय्यरने पदार्पण करताना अप्रतिम फलंदाजी केली. अशा स्थितीत तो प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रबळ दावेदार बनला आहे. त्याने 105 आणि 65 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे संघ अडचणीत असताना त्याने संयमी फलंदाजी करून सर्वांनाच प्रभावित केले होते. पण अय्यरने आपल्या बॅटींने परिस्थिती बदलून टाकली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राइक रेटही 80.22 आहे. हे पाहता टीम इंडियातील त्याचे स्थान निश्चित झाल्याचे दिसत आहे.
हनुमा विहारी
हनुमा विहारीच्या जागी अय्यरला न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळाली होती. प्लेइंग इलेव्हनसाठीही विहारीचा दावा मजबूत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारत अ संघाकडून खेळताना त्याने शानदार फलंदाजी केली. विहारीने 25, 54, नाबाद 72, 63 आणि नाबाद 13 धावा केल्या. या माध्यमातून त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आपला दावा ठामपणे मांडला आहे. अशाप्रकारे श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी या दोघांनी फॉर्म दाखवला आहे व दोघेही मधल्या फळीत खेळण्यासाठी दावेदार आहेत. फरक एवढाच की अय्यरने फिरकीपटूंसमोर खूप धावा केल्या आहेत. दुसरीकडे, हनुमाने उसळत्या खेळपट्ट्यांवर धावा केल्या आहेत. परदेशात कसोटी सामन्यात विहारीची कामगिरी भारतासाठी प्रभावी ठरली आहे. आणि हे पाहता तो दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा दावेदार आहे.
अजिंक्य रहाणे
रहाणेचा अलीकडचा फॉर्म चिंताजनक राहिला आहे. गेल्या एका वर्षात त्याने 12 कसोटी सामन्यांमध्ये 19.57 च्या सरासरीने केवळ 411 धावाच केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड रहाणेवरील विश्वास कायम ठेवतील की त्याला बाहेर ठेवतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रहाणेचा दक्षिण आफ्रिकेत मात्र चांगला रेकॉर्ड आहे. येथे त्याने तीन कसोटीत 53.20 च्या सरासरीने 266 धावा केल्या आहेत. रहाणेने दक्षिण आफ्रिकेत कसोटीत दोन अर्धशतके झळकावली आहेत.