
IND vs SA 1st Test Match: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील 26 डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय खेळला जाईल, कारण यजमान क्रिकेट बोर्ड कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटच्या प्रसारामुळे तिकीटांची विक्री करत नाही आहे. ‘न्यूज 24’ वेबसाइटने आफ्रिकन भाषेतील साप्ताहिक ‘रिपोर्ट’ या वृत्तपत्राचा हवाला देत म्हटले आहे की, कोरोना निर्बंधांमुळे सरकारने केवळ 2000 चाहत्यांनाच प्रवेश दिला आहे, त्यामुळे केवळ ठराविक प्रेक्षकच स्टेडियममध्ये सामना पाहू शकतील. इतकंच नाही तर 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याची तिकिटेही विकली जात नाहीत. आयोजक तथापि, पुढील आठवड्यात कोविड-19 संदर्भात सरकारी नियमांमध्ये काही बदल होतात की नाही याच्या प्रतीक्षेत आहेत. “कृपया लक्षात घ्या, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील #ImperialWanderers स्टेडियमवर होणाऱ्या आगामी कसोटी सामन्यासाठी तिकीट विक्रीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही,” स्टेडियमच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर म्हटले आहे. (India Tour of South Africa 2021-22: असा असेल भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा; जाणून घ्या वेळापत्रक, Squad, टेलिकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती)
“या क्षणी चाहत्यांना परवानगी दिली जाईल की नाही हे स्पष्ट नाही. आम्ही योग्य वेळी पुढील घोषणा करू.” गेल्या महिन्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचा उदय झाल्यानंतर कोविड-19 च्या वाढत्या धोक्याच्या दरम्यान ही मालिका होत आहे. गेल्या काही आठवड्यांत देशात कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रचलित परिस्थितीमुळे हा दौराच आधी गंभीर संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता, परंतु दोन्ही देशांच्या बोर्डांनी दौरा पुढे जाण्याचे मान्य केले. दरम्यान रविवारी, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने सावधगिरीचा उपाय म्हणून चार दिवसीय फ्रँचायझी मालिकेची उर्वरित फेरी, देशाची प्रमुख देशांतर्गत स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली.
दुसरीकडे, 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाने सराव सुरू केला आहे. सेंच्युरियनमध्ये भारतीय संघाने चांगलाच घाम गाळला. कवायतीसोबतच खेळाडूंनी नेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीचाही सराव केला आहे. भारतीय संघाला आगामी मालिकेत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. गेल्या 29 वर्षांत संघाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वात संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.