IND vs SA 3rd Test Day 3: थर्ड अंपायरच्या निर्णयाने संतप्त Virat Kohli चे अपशब्द कॅमेऱ्यात कैद, Dean Elgar वर चालवले शब्दांचे बाण (Watch Video)
डीन एल्गर आणि विराट कोहली (Photo Credit: Twitter)

IND vs SA 3rd Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. केपटाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या दिवशी सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या कसोटीच्या मालिकेत अनेकदा दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली आहे. आणि केपटाउन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी देखील असेच पाहायला मिळाले. दिवसाच्या तिसऱ्या व अंतिम सत्रात टीम इंडिया जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी आली तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरशी (Dean Elgar) भिडताना दिसला. (IND vs SA 3rd Test Day 3: षटकार खेचून चक्रावला रिषभ पंत, हातातून सुटली बॅट; दक्षिण आफ्रिकी खेळाडूंच्या हृदयाचा ठोका चुकला)

जसप्रीत बुमराहने आफ्रिकन डावातील 11 वे षटक पूर्ण केले तेव्हा ही घटना घडली. या घटनेननंतर जेव्हा मैदानावरील पंचांनी एल्गरला बाद घोषित केले पण थर्ड अंपायरने तो निर्णय उलटवल्यावर विराट चांगलाच संतापला आणि त्याच्या तोंडून अपशब्द बाहेर पाडले. दक्षिण आफ्रिकी संघ फलंदाजीला उतरल्यावर मोहम्मद शमीने सलामीवीर एडन मार्करमला बाद केल्यावर कीगन पीटरसन व एल्गर संघाचा डाव सावरत होते. यादरम्यान एल्गर आणि पीटरसन आपली बाजू बदलत असताना विराट कोहली यजमान कर्णधाराला चिडवताना दिसला. यादरम्यान विराटने एल्गरला बरंच काही ऐकवलं जे एका व्हिडिओमध्ये कैद झालं आहे. या 39 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली एल्गरला म्हणतो, “तुला काय वाटते डीन, मी गप्प बसेन. गेल्या सामन्यात सामनावीर ठरल्यानंतरही तुम्ही जसप्रीत बुमराहपासून दूर पळत आहात, विश्वास बसत नाही.” विराटने शब्दांचे असे बाण मारले की एल्गरचे बोलती बंद झाली आणि त्याच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही.

मात्र, विराट कोहलीला या घटनेनंतर रविचंद्रन अश्विनने एल्गरची जवळपास विकेट मिळवून दिली होती. अश्विनने षटकातील एका चेंडूवर एल्गरला पायचीतसाठी अपील केले. मैदानावरील पंचांनी एल्गरला बाद दिले ज्याने थर्ड अंपायरकडे रिव्यू घेतला. अंपायरने पाहिलेल्या रिव्यूत स्पष्ट दिसले बॉल स्टम्पच्या वरून जात आहे. यानंतर विराटने स्वतःवरचा ताबा गमावला आणि लाइव्ह सामन्यात त्याच्या तोंडून पुन्हा अपशब्द बाहेर पडले. दरम्यान भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी डीन एल्गरचा तोडगा काढण्याची गरज आहे कारण आफ्रिकी कर्णधार खेळपट्टीवर टिकून राहिल्यास भारतासाठी घातक ठरू शकतो.

थर्ड अंपायरने निर्णय उलटवल्यानंतर भारतीय कर्णधाराचा त्यावर विश्वास बसला नाही आणि त्याने संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनेनंतर कोहलीने जोरदार बडबड करत दबाव कायम असल्याचे जाणवून दिले.