IND vs SA 3rd Test Day 3: षटकार खेचून चक्रावला रिषभ पंत, हातातून सुटली बॅट; दक्षिण आफ्रिकी खेळाडूंच्या हृदयाचा ठोका चुकला (Watch Video)
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

कसोटीतही T20 आणि वनडे सारख्या आक्रमक फलंदाजीवर विश्वास ठेवणारा रिषभ पंत (Rishabh Pant) मैदानात असेल तर तो केवळ चेंडूच नाही तर क्षेत्ररक्षकांसाठीही चांगलाच धोकादायक ठरू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की बॉल ठीक आहे, क्षेत्ररक्षक का? पंतच्या बहुतेक षटकारांमध्ये एक गोष्ट समान आहे. आणि ते म्हणजे, जवळजवळ सर्व एका हाताने खेचलेले असतात. तो एका हाताने फलंदाजी करतो असे नाही, पण शॉट मारताना त्याचा हात बॅट सोडतो. मात्र, त्याहूनही अधिक काही केपटाउन कसोटी (Cape Town Test) सामन्यात घडले. आणि विरोधी संघाच्या खेळाडूंच्या हृदयाचा ठोका चुकला. (IND vs SA 3rd Test Day 3: रिषभ पंतचे शानदार शतक, टीम इंडिया दुसऱ्या डावात 198 धावांत ऑलआऊट; दक्षिण आफ्रिकेला 212 रन्सचे आव्हान)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूलँड्स येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याला 60व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ऑलिवरचा चेंडूचा सामना करायचा होता. पंत षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होता. पंतने पायांचा वापर करून प्रयत्न देखील केला, पण शॉट बॅटला नीट लागला नाही. इतकंच नाही तर इथे जे घडले ते थक्क करणारे होते. पंतच्या दोन्ही हातांनी बॅट सुटली. त्याला डीप पॉइंटच्या दिशेने खेळायचे होते, पण बॅट स्क्वेअर लेगच्या विरुद्ध दिशेने पडली. क्षेत्ररक्षक थोडा दूर होता त्यामुळे त्याला कोणालाही दुखापत झाली नाही हे दिलासादायक ठरले. मात्र, पंतच्या बॅट हातातून सुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. कोणताही धोका नसताना सर्वजण हसताना दिसत होते. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मालिकेच्या या निर्णायक सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताचा पहिला डाव 229 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात कीगन पीटरसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 210 धावा केल्या. अशापराकारे टीम इंडियाने 13 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात 198 धावा केल्या. यासह दक्षिण आफ्रिकेला 212 धावांचे लक्ष्य मिळाले. संघ अडचणीत असताना आणि धुरंधर फलंदाजी अपयशी ठरल्यावर रिषभ पंतने फलंदाजीची धुरा सांभाळत 139 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 100 धावा केल्या. तसेच उर्वरित भारतीय फलंदाजांनी 70 धावा केल्या.