IND vs SA 1st Test Day 4: वर्ष संपले, खेळ संपला! Virat Kohli पुन्हा अपयशी, आता 2022 मध्ये पुन्हा मिळेल 71 व्या शतकाची संधी
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियनमधील (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथील ड्रेसिंग रूममधून दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बाद झाल्याचा रिप्ले पाहिल्यावर विराट कोहली (Virat Kohli) अस्वस्थ दिसला. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यात तो सलग दुसऱ्यांदा स्वस्तात स्टंप बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. पहिल्या सत्रात चांगली सुरुवात केल्यानंतर चौथ्या दिवशी उपाहारानंतर मार्को जॅनसेनच्या (Marco Jansen) पहिल्याच चेंडूवर भारतीय कर्णधार 18 धावांवर बाद झाला. सेंच्युरियन कसोटीत दुहेरी अपयशासह कोहलीने आंतरराष्ट्रीय शतक न करता 2021 पूर्ण केले. विशेष म्हणजे कारकिर्दीत पहिल्यांदाच विराटवर अशी वेळ आली आहे की त्याने तिहेरी धावसंख्या न करता दोन वर्ष पूर्ण केली आहेत. कोहलीने 11 सामन्यांत 28.21 च्या सरासरीने 536 धावा करून 2021 पूर्ण केले. यादरम्यान कोहली कसोटी क्रिकेटमध्ये फक्त 4 अर्धशतकेच करू शकला.

सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात कोहली चांगल्या लयीत दिसत होता, पण बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. दुसऱ्या डावातही असेच घडले आणि विराट लूज शॉट्स खेळून बाद झाला. कर्णधार विराट कोहलीकडून अशा फटकेबाजीची कोणालाच अपेक्षा नव्हती. कोहलीचा दक्षिण आफ्रिकेतील रेकॉर्ड चांगला राहिला आहे, त्यामुळे 2019 सालापासून ज्या शतकाची तो वाट पाहत आहे ते या दौऱ्यावर नक्कीच येईल अशी आशा चाहत्यांना होती. आता या दौऱ्यावर येईल की नाही ते दौऱ्याखेरीस कळेलच करा हा दौरा नुकताच सुरू झाला आहे, पण 2021 मध्ये हे शतक येणार नाही. कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके नोंदवली असून त्याच्या 71व्या शतकाची प्रतीक्षा दोन वर्षांपासून सुरू आहे.

यंदाचे वर्ष फलंदाज म्हणून कोहलीसाठी फारच वाईट ठरले, याचा अंदाज यावरूनच लावता येऊ शकेल की कसोटी, वनडे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये विराट कोहली या वर्षी एक हजार धावाही पूर्ण करू शकला नाही. या वर्षी एकूण 24 सामने खेळले, ज्याच्या 30 डावात त्याच्या बॅटमधून फक्त 964 धावा केल्या आहेत. यादरम्यान कोहलीची सरासरी 37.07 होती, जी त्याच्या कारकिर्दीच्या सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. दरम्यान कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे तर विराटने या वाशी 11 सामने खेळले असून केवळ 536 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा दौरा असो, किंवा ऑस्ट्रेलियात खेळला जाणारा सामना असो किंवा इतर कोणतीही मालिका विराट कोहलीची बॅट सगळीकडेच अपयशी ठरली. कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. तर वनडे क्रिकेटमध्ये ऑगस्ट 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कोहलीचे शंभरी धावसंख्या ओलांडली होती.