IND vs NZ 2nd Test Day 1: वानखेडेवर पहिल्या दिवशी टीम इंडियाचा दबदबा, शतकवीर मयंक अग्रवालने सांभाळला मोर्चा; 4 विकेट घेऊन Ajaz Patel चमकला
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd Test Day 1: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. कानपूरमधील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर शुक्रवार 3 डिसेंबरपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 गडी गमावून 221 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर मयंक अग्रवाल सर्वोत्तम शतक झळकावले, तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन वादग्रस्त निर्णयामुळे निराशाजनक ठरले. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल एका टोकाने विकेट घेत असताना मयंक तळ ठोकून दिवसाखेर शानदार शतकी खेळी करून नाबाद राहिला. मयंक व्यतिरिक्त त्याचा सलामी जोडीदार शुभमन गिलने 44 आणि नवोदित श्रेयस अय्यरने 18 धावा केल्या. दुसरीकडे, मयंकने पहिल्या दिवशी मैदान मारलं असलं तरी न्यूझीलंडसाठी फिरकीपटू एजाज पटेलने चमकदार कामगिरी बजावली. किवी संघासाठी दिवसाखेर एकमात्र पटेलने सर्व चार विकेट घेतल्या तर अन्य गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. (IND vs NZ 2nd Test Day 1: आऊट की नॉटआऊट, Virat Kohli याच्या रिव्ह्यूने सोशल मीडियावर चर्चेला उधाण; पहा नक्की काय आहे वाद)

आजपासून सुरु झालेल्या सामन्याचे पहिले सत्र ओल्या खेळपट्टीमुळे वाया गेले. त्यानंतर दिवसाच्या दुसऱ्या सत्रापासून खेळाची सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून मयंक आणि शुभमनच्या सलामी जोडीने भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, 80 धावसंख्येवर भारताला पहिला धक्का बसला जेव्हा गिल 71 चेंडूत 44 धावांवर पटेलच्या चेंडूवर रॉस टेलरकडे स्लिपमध्ये झेलबाद झाला. यानंतर पटेलने आपल्या एकाच षटकांत टीम इंडियाला दुहेरी धक्के दिले आणि चेतेश्वर पुजारा पाठोपाठ कमबॅक करणारा विराट कोहलीला शून्यावर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. खेळाच्या सुरुवातीलाच झटपट दोन मोठ्या विकेट गमावल्यावर मयंकने श्रेयस अय्यरच्या साथीने किवी गोलंदाजांची क्लास घेत आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. यादरम्यान अग्रवालने 119 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. दोघे फलंदाज सेट झाले असताना पटेलच्या चेंडूवर 18 धावा करून अय्यर झेलबाद झाला. अखेरीस मयंक आणि रिद्धिमान साहाने दिवसाखेरीस संघाला आणखी कोणता फटका बसू न देता संघाची धावसंख्या दोनशे पार पोहचवली. मयंकने शुभमन आणि श्रेयस यांच्यासह प्रत्येकी 80 धावांची भागीदारी केली.

दरम्यान आजपासून सुरु झालेल्या सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणे, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या दुखापतीने भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यास बाग पाडले आहे. त्यांच्या जागी कर्णधार विराट कोहली, जयंत यादव आणि मोहम्मद सिराज संघात परतले आहेत. दुसरीकडे, किवी कर्णधार केन विल्यमसन दुखापतग्रस्त असल्याने संघाची कमान टॉम लाथमकडे असून विल्यमसनच्या जागी डॅरिल मिशेलला संधी मिळाली आहे.