IND vs NZ 2nd Test Day 1: आऊट की नॉटआऊट, Virat Kohli याच्या रिव्ह्यूने सोशल मीडियावर चर्चेला उधाण; पहा नक्की काय आहे वाद
विराट कोहली वादग्रस्त बाद (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर  (Wankhede Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आजपासून सुरु झालेल्या सामन्याच्या सुरुवातीला पावसामुळे अडथळा आला. ओल्या खेळपट्टीमुळे दिवसाचे पहिले सत्र पूर्णपणे वाया गेले आणि दुसऱ्या सत्रापासून दिवसाचा खेळ सुरु झाला. मुंबई टेस्ट (Mumbai Test) सामन्यातून नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे, पण त्याचे कमबॅक वेगळ्याच कारणामुळे संस्मरणीय ठरले. पहिल्या डावात विराटची विकेट वादग्रस्त ठरली. कोहलीला थर्ड अंपायरने ऑफ स्पिनर एजाज पटेलच्या (Ajaz Patel) गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू आऊट केले. डावाच्या 30व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कोहली बाद झाला. मात्र, पंचांचा निर्णय वादग्रस्त ठरला. चेंडू आधी बॅटला लागला आणि नंतर पॅडवर गेला. (IND vs NZ 2nd Test Day 1: वानखेडेवर पहिल्या दिवशी Tea ब्रेकची घोषणा; न्यूझीलंडचे दमदार पुनरागमन, टीम इंडियाच्या 3 बाद 111 धावा)

या निर्णयावर टीकाकारही आश्चर्यचकित झाले. थर्ड अंपायरने आऊट देताच कोहली मैदानावरील पंच अनिल चौधरी यांच्याकडे गेला. दोंघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली पण अखेर कोहलीला जड अंतःकरणाने पॅव्हिलियनच्या दिशेने जावे लागले. 4 चेंडूंचा सामना केल्यानंतर कोहलीला खातेही उघडता आले नाही. पटेलच्या डावातील 30व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीने बचाव केला. मात्र, त्याच्याकडून चेंडू वाचण्यात थोडी चूक झाली. आणि पटेलने LBW अपील केले. थर्ड अंपायर बराच वेळ रिप्ले पाहत राहिले, पण निर्णायक पुरावा नसल्याने त्यांनी मैदानावरील पंचांच्या निर्णयासोबत जाणे योग्य वाटले. अशाप्रकारे विराट 4 चेंडू खेळून खाते न उघडता तंबूत परतला आणि टीम इंडियाचा 80 धावसंख्येवर तिसरा झटका बसला. कोहली बाद झाल्यानंतर काही चाहते सोशल मीडियावर चांगलेच संतापले. विराटच्या बाद होण्याशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे तर भारतीय ताफ्यात तीन बदल पाहायला मिळाले आहेत. दुखापतीमुळे उपकर्णधार अजिंक्य रहाणे, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि गोलंदाज इशांत शर्मा बाहेर पडले असून त्यांच्या जागी विराट कोहली, जयंत यादव आणि मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, किवी संघाला सक्तीने बदल करावा लागला आहे कारण कर्णधार केन विल्यमसन कोपऱ्याच्या दुखापतीने ग्रस्त आहे. त्याच्या जागी किवी प्लेइंग इलेव्हनमध्ये डॅरिल मिशेलचा समावेश झाला आहे.