भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC फायनल (Photo Credit: PTI)

भारत दौऱ्यावर (India Tour) टी-20 मालिकेत क्लीन-स्वीपनंतर केन विल्यमसनचा न्यूझीलंड (New Zeaand) संघ कसोटी मालिकेत यजमानांविरुद्ध गेल्या तीन सामन्यातील विजयीरथ कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. गुरुवारपासून कानपूरमध्ये (Kanpur) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू होत आहे. न्यूझीलंडला टी-20 मालिका पराभव मागे सोडून नव्याने सुरुवात करायची आहे. न्यूझीलंड हा असा संघ आहे ज्याने गेल्या तीन वर्षांत आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये भारताला खूप त्रास दिला आहे. भारत दौऱ्यावर किवी संघ मात्र फार काही करू शकला नाही. तिला अजून भारतात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदा किवी संघ आपला इतिहास बदलू पाहत असेल. अशा परिस्थितीत संघातील हे पाच खेळाडू भारताच्या मार्गात अडथळा बनू शकतात आणि अडचणीत आणू शकतात. (IND vs NZ 1st Test: सूर्यकुमार यादव की Shreyas Iyer, कानपुर कसोटीत ‘हा’ धुरंधर करणार टेस्ट डेब्यू, स्थायी कर्णधार अजिंक्य रहाणेने केला शिक्कामोर्तब)

1. केन विल्यमसन (Kane Williamson)

कर्णधार विल्यमसन हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे. विल्यमसनला भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे तो टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. विल्यमसन बर्‍याच काळापासून आयपीएल खेळत आहे त्यामुळे त्याला भारतीय खेळपट्ट्यांशी कसे जुळवून घ्यावे हे त्याला चांगलेच माहित आहे. न्यूझीलंडच्या शेवटच्या भारत दौऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात विल्यमसनने 75 धावा केल्या. याशिवाय कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही विल्यमसनने अनुक्रमे 49 आणि नाबाद 52 धावांची खेळी केली होती.

2. टॉम लॅथम (Tom Latham)

सलामीवीर टॉम लॅथमवरही सर्वांच्या नजरा असतील. तो संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक असून सध्या सातत्याने धावा करत आहे. हॅमिल्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने शेवटचे शतक झळकावले होते. पण भारताच्या शेवटच्या दौऱ्यावर लॅथमची बॅट तळपली होती. त्याने तीन कसोटी सामने खेळले आणि तिन्हींमध्ये अर्धशतके झळकावली. त्याने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात 58, कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या डावात 74 आणि इंदूर येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 53 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत भारताला त्याच्यापासून सावधानी बाळगायची गरज आहे.

3. रॉस टेलर (Ross Taylor)

रॉस टेलर हे आणखी एक नाव आहे जे भारतीय संघासाठी अडचणीचे ठरू शकते. टेलरला भारतात खेळण्याचा खूप अनुभव असून तो 2010, 2012 आणि 2016 मध्ये भारत दौऱ्यावर कसोटी सामने खेळले आहेत. तो संघातील सर्वात अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. टेलर हा असा फलंदाज आहे ज्याला तग धरून कसे राहायचे फक्त हेच माहीत नाही, तर वेगवान धावा करणे देखील त्याच्या स्वभावात समाविष्ट आहे. यापूर्वी तो कानपूरच्या खेळपट्टीवर खेळला आहे. टेलरही आयपीएल खेळला आहे, त्यामुळे विल्यमसनप्रमाणे त्यालाही इथे फलंदाजी कशी करायची हे माहीत आहे.

4. एजाज पटेल (Ajaz Patel)

भारतीय खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल. त्यामुळे न्यूझीलंड संघात फिरकीपटूंची संख्या अधिक आहे. भारतात जन्मलेला एजाज पटेल देखील अशाच फिरकीपटूंपैकी एक आहे. एजाजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत केवळ नऊ सामने खेळले असून 26 विकेट्स घेतल्या आहेत. तो अंतिम-11 मध्ये खेळणार असल्याचे मानले जात आहे. त्याचे कारण म्हणजे त्याची उपखंडातील चमकदार कामगिरी. अबु धाबीमध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण करणाऱ्या पटेलने त्या सामन्यात सात विकेट घेतल्या होत्या. UAE व्यतिरिक्त तो श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळला आणि नऊ विकेट घेण्यात यशस्वी झाला. मात्र, भारताविरुद्ध संधी मिळाल्यास त्याचीही पहिलीच वेळ ठरेल.

5. मिचेल सँटनर (Mitchell Santner)

मिचेल सँटनर हा आणखी एक फिरकी गोलंदाज आहे जो भारतीय खेळपट्ट्यांवर आपले कौशल्य दाखवू शकतो. तो भारतात खेळला आहे आणि गेल्या दौऱ्यावर तीन सामन्यांत त्याने 10 विकेट घेतल्या आहेत. सँटनर बॅटनेही योगदान देऊ शकतो. भारतीय खेळपट्ट्यांवर नजर टाकली तर किवी दोन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरू शकतात. अशा स्थितीत सँटनेर आणि पटेल ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.