IND vs NZ 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी, पहिल्या सामन्यात ‘हिटमॅन’ आर्मीने मारली बाजी, चुरशीच्या लढाईत न्यूझीलंडवर 5 गडी राखून केली मात
सूर्यकुमार यादव (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs NZ 1st T20I 2021: जयपूर (Jaipur) येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) मालिकेच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या टीम इंडियाने (Team India) 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. चुरशीच्या लढाईत किवी संघाने पहिले फलंदाजी करून 164 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात भारताने 4 विकेट गमावून 19.3 षटकांत विजयीरेष पार केली आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माने 36 चेंडूत 48 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 62 धावांचे योगदान दिले. डेथ ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रशंसनीय प्रयत्न केले पण अखेरीस भारताने अंतिम षटकात जोरदार विजय मिळवला.दुसरीकडे, टी-20 विश्वचषक फायनल सामान्यापासून किवी संघाच्या पराभवाची मालिका इथे देखील सुरूच आहे. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने 2 तर मिचेल सँटनर, डॅरिल मिशेल, आणि साऊदीने प्रत्येकी 1 गडी बाद केला. (IND vs NZ T20I: पहिले Martin Guptill ने ठोकला सणसणीत षटकार, मग पुढच्याच चेंडूवर विकेट काढत दीपक चाहरने दिले जशास तसे उत्तर)

यापूर्वी सामन्यात टॉस गमावून न्यूझीलंड संघ पहिले फलंदाजीला उतरला होता. पहिल्याच षटकात डॅरिल मिशेल बाद झाल्यावर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी शतकी भागीदारी करून संघाच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाया रचला. यादरम्यान चॅपमनने 50 चेंडू खेळत 63 धावा तर गप्टिलने 42 चेंडूत दमदार 70 धावा ठोकल्या. किवी संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात दोघांनी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. मात्र मोक्याच्या क्षणी न्यूझीलंडला नियमित अंतराने धक्के बसत राहिले ज्यामुळे संघ अपेक्षित इतकी धावसंख्या उभारू शकला नाही. याउलट दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियासाठी केएल राहुल आणि रोहित शर्माच्या सलामी जोडीने संघाला अर्धशतकी भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. रोहित सुरुवातीपासून आक्रमक दिसला. राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर सूर्यकुमारला साथीला घेत संघाला विजयाच्या जवळ नेले.

रोहित शर्मा अर्धशतकाच्या जवळ असताना ट्रेंट बोल्टने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले आणि किवी संघाला मोठा दिलासा दिला. मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यर बाद झाल्यामुळे संघावर दबाव आला होता. अंतिम षटकात 10 धावांची गरज असताना व्यंकटेश अय्यरने आपल्या पहिल्या चेंडूवर चौकार खेचून फरक कमी केला पण पुढील चेंडूवर बाद झाला. अखेरीस अक्षर पटेलने एक धाव घेत रिषभ पंतला फलंदाजीची संधी दिली ज्याने चौकार खेचून विजय भारताच्या खिशात घातला.