मार्टिन गप्टिल, दीपक चाहर (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्माच्या टीम इंडियाने पाच गडी राखून विजय मिळवला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम येथे हा सामना खेळला गेला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि नवोदित कर्णधार रोहित शर्मा यांनी शानदार खेळी खेळली. टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघाने (Indian Team) विजयासह नवीन सुरुवात केली आहे. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचाही हा पहिलाच सामना होता. या सामन्यात भारतीय गोलंदाजीदरम्यान किवी सलामीवीर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) आणि दीपक चाहर (Deepak Chahar) यांच्यात यांच्यात एक मोठा रोमांचक किस्सा घडला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. गप्टिलने 42 चेंडूत 70 धावांची सुरेख खेळी करत न्यूझीलंडला पहिल्या डावात एक मजबूत व्यासपीठ मिळवून दिले. (IND vs NZ 1st T20I: पहिल्या सामन्यात ‘हिटमॅन’ आर्मीने मारली बाजी, चुरशीच्या लढाईत न्यूझीलंडवर 5 गडी राखून केली मात)

दीपक चाहरने श्रेयस अय्यरकडे सीमारेषेजवळ झेलबाद करून गप्टिलची शानदार खेळी संपुष्टात आणली. यापूर्वी न्यूझीलंडच्या फलंदाजी दरम्यान गप्टिलने 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला आणि काही वेळ चाहरकडे धरून पाहत राहिला. या दरम्यान दिपक त्याला उत्तर न देता मागे फिरला. पण पुढील चेंडूवर चाहरने दमदार कमबॅक केले आणि गप्टिलला बाद केल्यानंतर तो ड्रेसिंग रूमच्या दिशेने परत जाताना त्याला जशाच तसे उत्तर दिले. गप्टिल मैदानाबाहेर जात असताना चाहर देखील त्याच्याकडे रोखून पाहत राहिला. दोघांमधील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात यूजर्समध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.

उल्लेखनीय आहे की चाहरने चार षटकांत 42 लुटल्या आणि भारताचा महागडा गोलंदाज ठरला. मात्र, न्यूझीलंडला फक्त 164 धावांपर्यंत रोखण्यात गप्टिलच्या विकेटने महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला रोहित शर्माने पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या टी-20 मध्ये नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारने खेळाच्या पहिल्याच षटकात डॅरिल मिशेलची विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मार्क चॅपमन आणि गप्टिल शिवाय कोणताही किवी खेळाडू 12 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. भारताकडून भुवनेश्वर आणि अश्विन या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजने एक गडी बाद केला.