IND vs ENG 4th Test Day 3: रोहित-पुजाराने गाजवले ओव्हल, तिसऱ्या दिवसाखेर भारत 270/3, इंग्लंडवर घेतली 171 धावांची भक्कम आघाडी
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 3: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात ओव्हल (The Oval) मैदानात सुरु असलेला तिसऱ्या दिवसाचा खराब प्रकाशामुळे खेळ वेळेपूर्वीच संपुष्टात आला आहे. चौथ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला येत टीम इंडियाने दिवसाखेर धावा केल्या आणि ब्रिटिश संघावर 171 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. भारताकडून आश्वासक सुरुवातीनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेत 153 धावांची जबरदस्त भागीदारी केली आणि संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. रोहितने 256 चेंडूत सर्वाधिक 127 धावा चोपल्या तर पुजाराने आक्रमक पवित्रा घेत 127 चेंडूंचा सामना करत 61 धावा काढल्या. तसेच कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 22 धावा आणि रवींद्र जडेजा 9 धावा करून दिवसाखेर नाबाद परतले. दुसरीकडे, रोहित-पुजाराच्या फटकेबाजीपुढे एंगलसिह गोलंदाज हतबल दिसत होते. मात्र अखेरच्या सत्रात त्यांनी कमबॅक करून तग धरून खेळत असलेल्या पुजारा-रोहितला माघारी धाडलं. इंग्लंडसाठी ओली रॉबिन्सनने (Ollie Robinson) 2 तर जेम्स अँडरसनने 1 विकेट काढली. (IND vs ENG 4th Test: इंग्लंड खेळाडूंना ‘ही’ मोठी चुक पडली सर्वात महाग, ओव्हल टेस्टमध्ये Rohit Sharma ने संपुष्टात आणला परदेशात कसोटी शतकाचा दुष्काळ)

भारताकडून रोहित आणि केएल राहुलची सलामी जोडी तिसऱ्या दिवशी मैदानात उतरली. दोघांनी पहिल्या सत्राची उत्तम सुरुवात करताना अर्धशतकी भागीदारी केली आणि इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेत भारताचा डाव पुढे नेत असतानाच 34 व्या ओव्हरमध्ये राहुलला इंग्लंडने माघारी धाडलं. यादरम्यान रोहितलाही दोनवेळा झेल सुटल्याने जीवदान मिळाले. तथापि नंतर रोहित-पुजाराने जोडी जमवली आणि इंग्लंड गोलंदाजानावर हल्ला चढवला. पुजाराने रोहितला चांगली साथ देताना आणखी पडझड होणार नाही याची काळजी घेतली. रोहित संयमाने फलंदाजी करत असताना पुजाराने आक्रमक पवित्रा घेतला. रोहित-पुजाराने दुसरे सत्र पूर्ण खेळून काढले आणि भारताची आघाडी वाढवली. यादरम्यान रोहितने परदेशात पहिले कसोटी शतकही झळकावले. या खेळीदरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 11 हजार धावा, तर कसोटी कारकिर्दीत 3,000 धावा पूर्ण केल्या.

मात्र, दुसरा नवीन चेंडू इंग्लंडसाठी उपलब्ध होताच भारतीय संघाने एकाच ओव्हरमध्ये या दोघांच्याही विकेट्स गमावल्या. रॉबिन्सनने 81 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर रोहितला बाद केले तर अखेरच्या चेंडूवर पुजारा स्लीपमध्ये उभ्या असलेल्या मोईन अलीकडे झेलबाद झाला.