भारत विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 1:  इंग्लंडने (England) पहिले फलंदाजी करत पहिल्या डावात केलेल्या 205 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने (Indian Team) दिवसाखेर 1 विकेट गमावून 24 धावा केल्या आहेत. टीम इंडियाच्या पहिल्या डावाची निराशाजनक सुरुवात झाली. शुबमन गिल शून्यावर आऊट झाला आहे, अशास्थितीत यजमान संघ पहिल्या डावात इंग्लंडच्या 181 धावांनी पिछाडीवर आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाकडून (Team India) रोहित शर्मा 8 धावा आणि चेतेश्वर पुजारा 15 धावा करून खेळत होते. जेम्स अँडरसनने (James Anderson) दिवसाखेर इंग्लिश संघाला एकमेव यश मिळवून दिले. यापूर्वी, टीम इंडियाच्या फिरकीसमोर इंग्लंडने पुन्हा एकदा लोटांगण घातलं आणि पहिला डाव 205 धावांवर आटोपला. इंग्लंडसाठी अष्टपैलू बेन स्टोक्सने 55 धावांची खेळी केली तर बेन फोक्सने 46 धावा केल्या. ऑली पोपने 29 धावा आणि जॉनी बेयरस्टोने 28 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी पुन्हा एकदा आपल्या फिरकीचा जलवा दाखवला. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 3 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली तर मोहम्मद सिराजने 2 फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. (IND vs ENG 4th Test Day 1: टीम इंडियाचा भेदक मारा; बेन स्टोक्सची एकाकी झुंज, इंग्लंड पहिल्या डावात 205 धावांवर ऑलआऊट)

टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्यासाठी झॅक क्रॉली आणि डोम सिब्लीची जोडी सलामीला आली. पटेलने आपल्या पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर सिब्लीला क्लिन बोल्ड केलं आणि इंग्लिश संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर, अक्षरने झॅक क्रॉलीला सिराजच्या हाती 9 धावांवर कॅच आऊट केलं. कर्णधार जो रूट सलग तिसऱ्या डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि सिराजच्या चेंडूवर एलबीडबल्यू आऊट झाला. स्टोक्स आणि बेअरस्टोच्या जोडीने संघाला डाव सावरला आणि 48 धावांची भागीदारी केली पण, दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला सिराजने ही सेट जोडी फोडली. सिराजने बेअरस्टोला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. बेअरस्टोने 28 धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाज इंग्लिश टीमवर वरचढ ठरले आणि त्यांना बांधून ठेवलं. यादरम्यान, स्टोक्सने चौकारासह झुंजार अर्धशतक पूर्ण केलं आणि इंग्लंडने 100 धावांचा टप्पा ओलांडला. पण, अर्धशतक पूर्ण करताच वॉशिंग्टन सुंदरने स्टोक्सला एलबीडब्लयू आऊट करत माघारी धाडलं.

ओली पोप आणि डॅन लॉरेन्सच्या जोडीने संयमीपणे भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना केला. जॅक लीचने अश्विनच्या बोलिंगवर चौकार खेचत संघाची धावसंख्या 200 पार नेली. मात्र, यानंतर संघाकडे विकेट शिल्लक नसल्याने मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला आणि पहिला डाव 205 धावांवर आटोपला.