IND vs ENG 4th Test 2021: टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतने (Rishabh Pant) अहमदाबाद (Ahmedabad_ येथे नव्याने बनवलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी झुंजार खेळी करत कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक झळकावले. पंतने आपल्या शानदार खेळीदरम्यान अनेक शॉट्स लगावले. सामन्यादरम्यान त्याने विरोधी संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या (James Anderson) एका चेंडूवर आकर्षक रिवर्स स्वीप शॉट खेळला ज्याची फक्त चाहत्यांनाच नव्हे तर जगभरातील क्रिकेटपटूंनाही भुरळ पडली आहे. पंतच्या या उत्कृष्ट शॉटचे सर्वत्र कौतुक होत आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी अनुभवी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफने सोशल मीडियावर या शॉटचा व्हिडिओ शेअर करत पंतची प्रशंसा केली आहे. अँडरसनला पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्विपचा फटका मारत चौकार मारत नव्वदीत प्रवेश केला होता. (IND vs ENG 4th Test 2021: Rohit Sharma याने विचारले- 'विकेटच्या मागे का इतकी बडबड करतो?' Rishabh Pant याने दिले मन जिंकणारे उत्तर)
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाजाचा मान मिळवणाऱ्या आणि 600 पेक्षा अधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या अँडरसनविरुद्ध पंतचा रिव्हर्स स्वीपचा शॉट पाहून सर्वच चकित झाले, त्यामुळे या शॉटचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून याचा व्हिडिओ देखील यूजर्समध्ये व्हायरल होत आहे. फ्लिंटॉफनेही ‘वाह!’ अशा कॅप्शनसह पंतच्या शॉटचा व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय जेव्हा पंतने मैदानात हा शॉट खेळला तेव्हा प्रेक्षक आणि ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेले सर्व भारतीय खेळाडू चकित झाले. यादरम्यान, अँडरसनला देखील हा काय शॉट आहे हे समजलेच नाही. मात्र, अखेर 85व्या ओव्हरमध्ये अँडरसनने टाकलेल्या चेंडूवर पंत रुटकडे झेल देऊन बाद झाला.
Unbelievable 😳 Shot by Rishabh Pant♥️🔥#INDvENG #RishabhPant pic.twitter.com/NywHQP8mvd
— Mukesh Rao (@mrao15722) March 5, 2021
दरम्यान, सामन्यानंतर रोहित शर्माने पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची मुलाखत घेतली जिथे अँडरसनविरुद्ध या फटक्याबद्दल विचारले असता पंत म्हणाला, “रिव्हर्स स्वीप मारताना, तुम्हाला आधी विचार करावा लागतो, पण जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने होत असतात, तेव्हा ते होते. मला खेळाचे आकलन झाल्यानंतर बऱ्याचदा माझे शॉट खेळण्याचे लायसन्स मला मिळते. प्रेक्षकांचे मनोरंजन होत असेल, तर मी आनंदी आहे.” पंतने 118 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 101 धावा केल्या. सुंदरने त्याला चांगली साथ दिली आणि सातव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली.