
IND vs ENG 3rd Test: इंग्लंडविरुद्ध (England) लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) येथे तिसऱ्या कसोटी सामन्याचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाने (Team India) विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे आणि आता लीड्सवर देखील आपली विजयी मोहीम सुरु ठेवण्याच्या निर्धाराने भारतीय संघ (Indian Team) मैदानात उतरेल. इंग्लंड दौऱ्यावरील तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठी खुशखबर मिळाली आहे. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) पुष्टी केली की शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) तंदुरुस्त आहे आणि निवडीसाठी उपलब्ध आहे पण म्हटले की भारताने इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले कसोटीसाठी त्यांच्या संयोजनावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे शार्दुलला दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले होते. शार्दुलने पहिल्या कसोटीत 4 विकेट घेतल्या पण दुसऱ्या डावात फक्त 13 ओव्हर गोलंदाजी केली. लॉर्ड्स कसोटीत त्याच्याऐवजी ईशांत शर्माचा समावेश करण्यात आला होता आणि वरिष्ठ वेगवान गोलंदाजाने दोन्ही हातांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. (IND vs ENG 3rd Test: तब्ब्ल 2 वर्षे शतक रहित राहिलेला Virat Kohli मोठा आंतरराष्ट्रीय विक्रम रचण्यापासून फक्त 63 धावा दूर)
रहाणेने पुष्टी केली की सर्व भारतीय वेगवान गोलंदाज मैदानात उतरण्यासाठी तंदुरुस्त आहेत आणि दोन कसोटी दरम्यान 9 दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर खेळण्यास उत्सुक आहेत. “शार्दुल ठाकूर तंदुरुस्त आहे आणि तिसऱ्या कसोटीसाठी निवडीसाठी उपलब्ध आहे. आता आपण कोणत्या कॉम्बिनेशनसह जायचे आहे हे पाहावे लागेल. सर्व वेगवान गोलंदाज खेळण्यासाठी तयार आहेत आणि त्यांना दुसऱ्या कसोटीनंतर ब्रेकनंतर खेळायचे आहे,” रहाणेने सोमवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, लॉर्ड्सवर शार्दूलच्या जागी खेळलेला इशांत शर्माने प्रभावी कामगिरी केली पण तिसऱ्या कसोटीतून त्याचा पत्ता कट होऊ शकतो कारण ईशांत शार्दूलइतका फलंदाजीने कमाल दाखवू शकत नाही. शार्दुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आश्चर्यकारक फलंदाजी करून भारताला विजय मिळवून देण्यात मदत केली होती. अशा परिस्थितीत तो पुन्हा एकदा प्लेइंग 11 मध्ये कमबॅक करू शकतो.
दरम्यान, सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या संयोजनावर असतील कारण जर परिस्थिती 2 स्पिनर्स खेळण्याची संधी देत असतील तर भारत आर अश्विनचा समावेश करू शकतो. इंग्लंडविरुद्ध भारताला घरच्या मैदानावर विजय मिळवून देणाऱ्या अश्विनने पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला नाही कारण भारताने रवींद्र जडेजाला एकमेव फिरकी गोलंदाजी अष्टपैलू म्हणून पसंती देण्यात आली होती.