IND vs ENG 3rd Test: ‘अहंकार खिशात ठेवा’! विराट कोहलीच्या सतत फ्लॉप-शोवर संतापला भारतीय दिग्गज, देऊन टाकला ‘हा’ सल्ला
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test 2021: लॉर्ड्स कसोटीत यजमान इंग्लंडचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाचा (Team India) सामना आता लीडिंगच्या (Leeds) हेडिंग्ले (Headingley) येथे तिसऱ्या कसोटीत इंग्लंडशी होत आहे. बऱ्याच काळानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पहिल्यांदा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात खूपच खराब झाली आणि टीम इंडिया फक्त 78 धावांवर ढेर झाली. इतकंच नाही तर कोहलीची बॅट पुन्हा एकदा फ्लॉप झाली. उर्वरित कसोटी सामन्यांप्रमाणे, विराटच्या खराब फॉर्मने तिसऱ्या कसोटीतही त्याचा पाठलाग सोडला नाही. विराट सामन्याच्या पहिल्या डावात फक्त 7 धावाच करू शकला. या संपूर्ण मालिकेतील कोहलीची सर्वोत्तम खेळी 42 धावांची आहे. कोहलीला त्याच्या फॉर्मच्या पुनरुत्थानाबद्दल धडा देत, भारताचा माजी क्रिकेटपटू मनिंदर सिंहने (Maninder Singh) त्याला अहंकार खिशात ठेवून तो जे उपदेश करतो ते करण्याचा सल्ला दिला. (IND vs ENG 3rd Test: इंग्लंडचा ‘हा’ मॅच-विनर ठरतोय टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी, लीड्सच्या हेडिंग्लेवर इतिहास रचण्यासाठी तयार)

“कसोटी सामन्याआधी विराट कोहली म्हणाला होता की या इंग्लिश परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा अहंकार तुमच्या खिशात ठेवावा लागेल. आणि मला वाटते की हे अगदी बरोबर आहे. जर त्याने वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, जसे की विराट कोहली सहसा करतो, ही अशी खेळपट्ट्या नाहीत जिथे तो अशी फलंदाजी करू शकतो,” मनिंदर यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला म्हटले. “त्याला तिथे काही वेळ घालवणे आवश्यक आहे, जसे त्याने मागील दौऱ्यात केले होते जिथे त्याने जवळजवळ 600 धावा केल्या होत्या. एकदा तुम्हाला वेग माहीत झाला आणि चेंडू किती भोवती फिरत आहे हे समजल्यावर तुम्ही तुमचे शॉट्स खेळू शकता,” त्याने पुढे म्हटले.  विराटसाठी 2014 इंग्लंड दौरा निराशाजनक राहिला होता पण त्याने 2018 दौऱ्यासाठी आपल्या खेळात अफाट सुधारणा करत तब्ब्ल 600 धावा काढल्या. 2021 च्या दौऱ्यावर, तथापि, मनिंदरला वाटते की कोहली 7 वर्षांपूर्वी केलेल्या चुका करत आहे.

“विराट कोहली मुळात त्याच चुका करत आहे जो तो त्याच्या पहिल्या इंग्लंड दौऱ्यात करत होता. तो शरीरापासून दूर खेळत आहे. जर तुम्ही नियमित क्रिकेट खेळत नसाल तर तुमच्या बाबतीत असे होऊ शकते,” मनिंदर म्हणाले. दरम्यान, हेडिंग्ले येथे तिसऱ्या कसोटीत भारत बॅकफूटवर आहे आणि पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात 45 धावांनी आघाडीवर आहे. आता फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांकडून संघाला सामन्यात कमबॅक करून देण्याची जबाबदारी असेल. दुसरीकडे, लीड्स कसोटी जिंकून इंग्लंड मालिका 1-1 ने बरोबरीत ठेवू पाहत आहे.