IND vs ENG 3rd T20I 2021: इंग्लंड (England) संघाविरुद्ध पहिले फलंदाजी करत यजमान टीम इंडियाची (Team India) फलंदाजी तिसऱ्या टी-20 सामन्यात पुन्हा एकदा ढासळली. कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद 76 धावा आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) 17 धावांच्या जोरावर भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून अहमदाबादच्या कठीण खेळपट्टीवर 156 धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लिश संघाला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले. विराटने आपल्या खेळीत 8 चौकर आणि 4 षटकार लगावले. संघाकडून विश्रांतीनंतर पहिला सामना खेळणाऱ्या रोहित शर्माने 15 धावा केल्या तर केएल राहुलच्या अपयशाचे सत्र यंदाही सुरूच राहिले आणि तो सलग दुसऱ्यांदा भोपळा न फोडता माघारी परतला. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज मार्क वूडने (Mark Wood) भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि सर्वाधिक विकेट्स घेतल्या. मार्क वगळता क्रिस जॉर्डनला 2 विकेट मिळाल्या. दोन्ही संघातील पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. (IND vs ENG 3rd T20I: तिसऱ्या टी-20 सामन्यात KL Rahul याला कायम ठेवत Suryakumar Yadav याला दिला डच्चू, निराश नेटकऱ्यांनी सुनावले कडू बोल)
टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला वूडने 7 धावसंख्येवर पहिला धक्का दिला आणि राहुल शून्यावर पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर, इंग्लिश गोलंदाजाने मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या रोहितला 15 धावांवर माघारी पाठवलं. जॉर्डनने संघाला तिसरा धक्का देत दुसऱ्या सामन्यात अर्धशतकवीर ईशानला बाद केले. ईशानने 4 धावा केल्या. त्यानंतर, कर्णधार कोहलीला साथ देण्यासाठी आलेल्या रिषभ पंतने काही मोठे शॉट्स खेळले. पंतने आदिल रशीदच्या गोलंदाजीवर सलग 2 चौकार लगावले. तथापि, पंत चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेऊ शकला नाही आणि चोरटी धाव घेण्याच्या नादात रन आऊट झाला. पंतने 25 धावा केल्या. यानंतर, वूडने श्रेयस अय्यरला 9 धावांवर बाउंड्री लाईनवर डेविड मलानकडे झेलबाद केले. अखेर विराट आणि पांड्याच्या जोडीने संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान, कोहलीने चौकार खेचत 37 चेंडूत दुसरे तर कारकिर्दीतील 27वे आंतरराष्ट्रीय टी-20 अर्धशतक ठोकले.
दरम्यान, अहमदबाद येथील आजचा सामना इंग्लिश कर्णधार इयन मॉर्गनच्या टी-20 कारकिर्दीतील 100वा सामना आहे. मॉर्गन अशी कामगिरी करणारा पहिला इंग्लिश तर चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. शिवाय, तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघात प्रत्येकी 1 बदल करण्यात आला आहे. टॉम कुरनला बाहेर करत इंग्लंडने मार्क वूडचा समावेश केला तर यजमान भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या जागी रोहित शर्माला स्थान दिले आहे.