IND vs ENG 3rd T20I 2021: भारताने (India) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 157 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लडने (England) तिसऱ्या टी-20 सामन्यात एकतर्फी 8 विकेटने विजय मिळवला. या विजयासह इयन मॉर्गनच्या (Eoin Morgan) इंग्लिश संघाने पाचस सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करत यजमान संघाच्या आघाडीच्या फलंदाजांवर दबदबा कायम ठेवला होता, पण कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अखेरच्या ओव्हरमध्ये सूत्रे हाती घेत चौकार-षटकारांची बरसात केली. अहमदाबादच्या खेळपट्टीवर संघाचे अन्य फलंदाजांना संघर्ष करावा लागत असताना विराटने नाबाद 77 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर क्रिस जॉर्डनला 2 विकेट मिळाल्या. इंग्लंडकडून सलामी फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) 83 धावा करून नाबाद परतला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी काही प्रेमुख विक्रमांना गवसणी घातली जे खालीलप्रमाणे आहे. (IND vs ENG 3rd T20I 2021: बटलरच्या स्फोटक खेळीने विराटच्या अर्धशतकी खेळीवर फेरले पाणी; इंग्लंडची मालिकेत 2-1 ने सरशी)
1. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलचा खराब फॉर्म कायम आहे. यंदाही राहुल शून्यावर बाद झाला आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग दोन वेळा भोपळा न फोडता बाद होणार पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
2. इतकंच नाही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आणि या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत तो दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. टी-20 मध्ये यापूर्वी, विराट कोहली, रिषभ पंत, सुरेश रैना, युसुफ पठाण आणि वॉशिंग्टन सुंदर प्रत्येकी तीन वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
3. राहुलने आता सलामी फलंदाजी म्हणून टी-20 सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत रोहित शर्माची बरोबरी केली आहे राहुल आणि रोहित आता सर्वाधिक चार वेळा शून्यावर पॅव्हिलियनमध्ये परतले आहे.
4. विराट कोहलीनेही या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावत आपल्या टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचे 27वे अर्धशतक ठोकले जे या फॉरमॅटमध्ये कोणत्याही फलंदाजाद्वारे केलेले सर्वाधिक आहे.
5. विराटने आजच्या सामन्यात 46 चेंडूंत नाबाद 77 धावा फटकावून 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यासह कर्णधार म्हणून विराटने टी-20 मध्ये 11व्या वेळी 50 किंवा अधिक धावांची खेळी केली आहे.
6. केएल राहुल आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीत सलग दुसऱ्यांदार शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
7. टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक 50 किंवा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनची बरोबरी केली आहे. कॅप्टन विल्यमसन आणि विराटने 11 वेळा अर्धशतकी किंवा अधिक धावांची खेळी केली आहे.
8. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाज म्हणून कोहलीने 50व्या वेळी 50 किंवा अधिक पेक्षा जास्त धावांचा डाव खेळला आणि कारकीर्दीत 49 वेळा असे काम करणाऱ्या सचिन तेंडुलकरला त्याने मागे टाकले.
9. भारताविरुद्ध टी-20 सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच इयन मॉर्गन इंग्लंडसाठी 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. या खास विक्रमासह, मॉर्गन 100 किंवा अधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील चौथा खेळाडू ठरला.
10. जॉनी बेअरस्टोने नाबाद 40 धावांची दमदार खेळी करत बटलरला चांगली साथ दिली. यासह बेअरस्टोने 49 टी-20 सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हजारी गाठली आणि 1010 धावा केल्या. इंग्लंडकडून एकहजार टी-20 धावा करणारा बेअरस्टो पाचवा फलंदाज ठरला.
दरम्यान, दोन्ही संघात आता चौथा सामना 18 मार्च रोजी खेळला जाईल. सामन्यात इंग्लंड संघ विजय मिळवल्यास मालिका खिशात घालेल तर भारतीय संघ इंग्लिश संघाची 2-2 अशी बरोबरी करेल.