
IND vs ENG 2nd Test: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) उत्कृष्ट कामगिरी करत 151धावांनी विजय मिळवत मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली आहे. लॉर्ड्सवर मिळवलेला भारताच्या इतिहासातील हा तिसरा विजय ठरला आहे. भारताने इंग्लंडला 272 धावांचे आव्हान दिले होते. पण इंग्लंडला दुसऱ्या डावात 51.5 ओव्हरमध्ये 120 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक 33 धावांचे योगदान दिले. आपल्या डावादरम्यान, रूटने 60 चेंडूंचा सामना केला आणि पाच चौकार लगावले. दुसरीकडे, भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तसेच जसप्रीत बुमराहने 3, इशांत शर्माने 2 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली. या ऐतिहासिक सामन्यात भारताच्या विजयात तीन कारणे महत्वपूर्ण ठरली. ()
1. लॉर्ड्स कसोटी विजयात सलामीवीर केएल राहुलचे मोठे योगदान होते. पहिल्या डावात एकीकडे आघाडीचा वरचा क्रम घसरत असताना तो दुसरे टोक धरून स्थिरावला. या दरम्यान, त्याने 129 धावांची उत्कृष्ट शतकी कामगिरी केली. राहुलने त्याच्या अप्रतिम खेळीदरम्यान 250 चेंडूंचा सामना केला आणि 12 चौकार व एक षटकार खेचला.
2. लॉर्ड्स कसोटीत भारतीय वेगवान गोलंदाजांनी विरोधी संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. सामन्यादरम्यान, इशांत शर्माने एकूण पाच विकेट्स घेतल्या, मोहम्मद शमीला तीन, मोहम्मद सिराजला आठ आणि जसप्रीत बुमराह तीन विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. यादरम्यान विरोधी कर्णधार जो रूट व्यतिरिक्त इतर इंग्लिश फलंदाज भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर लढा देऊ शकले नाही.
3. लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी शमी आणि बुमराह यांच्यातील 89 धावांची नाबाद अर्धशतकी भागीदारी कायमस्वरूपी स्मरणात राहील. दोन्ही खेळाडूंनी कठीण परिस्थितीत फलंदाजी करत संघासाठी मोठे लक्ष्य गाठून दिले. शमीने यादरम्यान कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक नाबाद 56 धावांची अर्धशतकी खेळी देखील खेळली. बॅटनंतर शमी-बुमराहने बॉलने देखील जलवा दाखवला. टीम इंडियाच्या विजयात शमीची अष्टपैलू कामगिरी खूप प्रभावी ठरली.
दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला नॉटिंगहम कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. आता तिसरा सामना 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. कर्णधार विराट कोहलीला हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल.