IND vs ENG Series 2021: इंग्लंड महिला (England Women) संघाविरुद्ध कसोटी मालिका अनिर्णित राहिल्यावर टीम इंडिया (Team India) ब्रिटिश संघाविरुद्ध मर्यदित ओव्हरची मालिका खेळत आहे. बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी मिताली राजच्या (MithalI Raj) नेतृत्वात संघाने इंग्लंडला जबरदस्त झुंज दिली. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) सुद्धा भारतीय महिला संघाच्या कामगिरीने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी संघाचे जोरदार कौतुक केले. तथापि, वॉनने यंदाही आपल्या वक्तव्याने ‘विराटसेने’वर निशाणा साधला व टोला लगावला. वॉन भारतीय संघाबद्दल नेहमीच वादग्रस्त प्रतिक्रिया देत असतात. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पाच गडी राखूनही पराभव पत्करावा लागला होता, परंतु 222 धावसंख्येच्या प्रत्यत्तरात भारतीय संघाने यजमान इंग्लंडसमोर (England) कडक आव्हान उभे केले. (IND W vs ENG W ODI 2021: टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव, मिताली राजचे झुंजार अर्धशतक व्यर्थ; इंग्लंडची मालिकेत 2-0 विजयी आघाडी)
वॉनने आपल्या ट्विटरवर लिहिले की, “भारतीय महिला संघ आज उत्कृष्ट प्रदर्शन करीत आहे…किमान 1 भारतीय क्रिकेट संघ इंग्लिश परिस्थितीत खेळू शकतो हे पाहून आनंद झाला.” ट्विटच्या दुसर्या भागामध्ये भारतीय पुरुष संघावर निशाणा साधल्याचे दिसत आहे. नुकतंच विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला न्यूझीलंड विरोधात झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. कसोटी सामन्याच्या सहाव्या दिवशी सामन्यात भारताची गंभीर स्थिती पाहून वॉनने टीम इंडियाच्या चाहत्यांविषयी एक ट्विट केले होते. ते म्हणाले होते, “मला वाटते काही तासांत हजारो भारतीय क्रिकेट चाहत्यांना माझी माफी मागावी लागेल. न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकेल असा माझा अंदाज आहे.”
The Indian women’s team are putting in an excellent display today … Good to see at least 1 Indian cricket team can play in English conditions … 😜😜
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 30, 2021
भारत आणि इंग्लंड महिला संघातील दुसर्या एकदिवसीय सामन्यात ब्रिटिश संघाने 5 गडी राखून विजय मिळविला. सोफिया डन्कलीच्या 73 धावांची नाबाद खेळी आणि केट क्रॉसच्या जोरदार गोलंदाजीमुळे इंग्लंडने आता तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली आहे. इंग्लंडने यापूर्वी पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केला होता. भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने पुन्हा एकदा सर्वाधिक धावा केल्या. मितालीने 59 धावांची झुंजार खेळी केली तर युवा सलामीवीर शेफाली वर्माने 44 धावांचे योगदान दिले. तथापि, भारतीय संघाच्या मधला व खालची फळी फारसा हातभार लावू शकला नाही आणि संपूर्ण 50 ओव्हरमध्ये 221 धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून केट क्रॉसने 34 धावांवर पाच विकेट्स घेतल्या.