IND vs ENG 1st Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून नॉटिंगहम (Nottingham) येथे सुरू होणार आहे. टीम इंडियाने (Team India) आपली पूर्ण तयारी केली आहे. ऑस्ट्रेलियानंतर यंदा टीम इंडियाला ब्रिटनमध्ये इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी आहे. टीम इंडियाने अखेर 2008 मध्ये माजी कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्वात ब्रिटिश संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होत्या. त्यांनतर एमएस धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वात दोन कसोटी मालिकेत संघ विजयीरेष ओलांडू शकला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी आहे आणि विराटसेना पूर्णपणे तयार आहे. पण इंग्लंडमध्ये जाऊन त्यांना पराभूत करणे सोपे होणार नाही. हिरव्या खेळपट्ट्यांवर चेंडू उसळतो आणि वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. ब्रिटिश संघात पहिला दोन सामन्यांसाठी जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे. (IND vs ENG: कर्णधार विराट कोहली दिग्गजांना मागे टाकण्याच्या नजिक, इंग्लंडविरुद्ध ‘रनमशीन’च्या रडारवर ‘हे’ 6 मोठे पराक्रम)
अँडरसन-ब्रॉडची वेगवान जोडी इंग्लंडसाठी गेल्या अनेक वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये प्रभावी ठरली आहे. शिवाय, हिरव्या खेळपट्टीवर दोघे घातक ठरू शकतात. अँडरसनने भारताविरुद्ध 30 कसोटी सामन्यांमध्ये 118 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो नेहमी इंग्लंडच्या स्विंग खेळपट्ट्यांवर फलंदाजांना अडचणीत टाकतो. अशास्थितीत टीम इंडियाला अँडरसनपासून बरेच सावध राहावे लागणार आहे. दुसरीकडे, घरच्या परिस्थतीत खेळण्याचा ब्रॉड देखील चांगला उपयोग करून घेऊ शकतो. ब्रॉड देखील भारताविरुद्ध यशस्वी ब्रिटिश गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने भारताविरुद्ध 22 कसोटी सामन्यात एकूण 70 विकेट्स काढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ब्रॉडचा दबदबा पाहायला मिळत आहे. त्याने आतापर्यंत 148 सामन्याच्या 272 डावात 523 विकेट्स काढल्या आहेत.
दुसरीकडे, सर्वात मोठे कारण जे या दोन्ही वेगवान गोलंदाजांच्या बाजूने जाते ते म्हणजे मायदेशी दोंघांची कामगिरी. अँडरसन आणि ब्रॉडने मायदेशात अनुक्रमे 387 व 340 गडी बाद केले आहेत. तसेच वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर कोणताही धोका न पत्करता भारतीय खेळाडूंना त्यांच्यापासून सावध राहुल खेळण्याची गरज आहे.