भारत विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 4: नॉटिंगहम कसोटी (Nottingham Test) सामन्याच्या दुसऱ्या डावात यजमान इंग्लंड (England) संघ 303 धावांवर गारद झाला आहे. अशाप्रकारे टीम इंडियाला (Team India) पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी 209 धावांचे टार्गेट मिळाले आहेत. इंग्लंडकडून पुन्हा एकदा कर्णधार जो रूटने (Joe Root) जबरदस्त कामगिरी करत 21 वे कसोटी शतक ठोकले. रुटने 154 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. तसेच सॅम कुरनने (Sam Curran) 32 तर जॉनी बेअरस्टोने 30 धावांचे योगदान दिले. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावात देखील मात्तबर इंग्लिश खेळाडू भारतीय गोलंदाजांपुढे जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाही. दुसरीकडे, भारतासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सर्वाधिक पाच विकेट्स काढल्या. शिवाय, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या. मोहम्मद शमीला एक विकेट मिळली. (Tokyo Olympics 2020 खेळात भारताच्या खात्यात सुवर्ण पदकाची भर, सुनील गावस्कर यांनी कमेंटरी सोडून केला भांगडा)

इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांत गुंडाळत भारतीय संघाने 95 धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने चांगली सुरुवात केली पण नियमित अंतराने संघ विकेट्स गमावत राहिला ज्यामुळे त्यांना मोठी आघाडी घेता आली नाही. पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडने आज सुरुवातीलाच दोन विकेट गमावल्याने सलामीवीर डॉम सिब्ली आणि कर्णधार रुटने संयमी खेळ करून अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, रुटने अवघ्या 68 चेंडूत अर्धशतक फटकावलं. पण दुसऱ्या सत्रात बुमराहने सिब्लीला बाद करून ही घातक ठरणारी भागीदारी मोडली. त्यानंतर जॉनी बेअरस्टो व डॅन लॉरेन्स देखील रूटला अधिककाळ खेळपट्टीवर साथ देऊ शकले नाही. एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना संयमी फलंदाजी करणाऱ्या रुटने पुढाकाराने नेतृत्वात करत शानदार शतक फटकावलं.

यानंतर रूट शतकाचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही आणि बुमराहने त्याची खेळी संपुष्टात आणली. रूट माघारी परतल्यावर अष्टपैलू सॅम कुरन 45 चेंडूत 32 धावांचे छोटेखानी योगदान देऊन बाद झाला. बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडला पहिल्याच चेंडूवर परतीचा रस्ता दाखवला.