IND vs ENG 1st Test Day 1: जो रूटची एकाकी झुंज, पहिल्या डावात इंग्लंड 183 धावांवर ढेर; भारतीय गोलंदाजांची आक्रमक कामगिरी
भारत विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 1: भारताविरुद्ध (India) नॉटिंगहम (Nottingham) येथील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड कर्णधार जो रूटने (Joe Root) टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला पण खेळाडूंच्या सुमार कामगिरीमुळे यजमान संघ पहिल्या डावात 65.4 ओव्हरमध्ये 183 धावांवर ढेर झाला. ब्रिटिश संघासही कर्णधार रूटने एकाकी झुंज देत सर्वाधिक 64 धावा काढल्या तर भारताकडून मोहम्मद शमी (Mohammed Shami) , शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या वेगवान गोलंदाजांनी चहुबाजूने आक्रमण करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारू दिली नाही. भारताकडून बुमराहने 4 विकेट्स काढल्या तर मोहम्मद शमीला 3, मोहम्मद सिराज 2 व शार्दूल ठाकूरने 1 विकेट काढली. दुसरीकडे, रूट वगळता जॉनी बेअरस्टोने 29 आणि झॅक क्रॉलीने 27 धावांचे योगदान दिले. तसेच सॅम कुरनने (Sam Curran) नाबाद 27 धावा काढल्या. (IND vs ENG 1st Test: जो रूटने रचला इतिहास, अ‍ॅलिस्टर कुकला पछाडत इंग्लंड खेळाडूंच्या ‘या’ यादीत नंबर वनच्या सिंहासनावर झाला विराजमान)

नाणेफेक गमावल्यावर टीम इंडियाने सामन्याची सुरुवात धमाकेदार केली. पहिल्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने ब्रिटिश सलामीवीर रॉरी बर्न्सला शून्यावर पायचीत करत माघारी धाडलं. त्यानंतर डॉम सिब्ली-क्रॉलीने इंग्लंडचा डाव सावरला. पण 21व्या ओव्हरमध्ये सिराजने क्रॉलीला बाद करत ही भागीदारी तोडली. क्रॉलीने 67 चेंडूत 4 चौकारांसह 27 धावा केल्या. कर्णधार रुटने सिब्लीला पुन्हा संघाची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या सत्रात सिब्ली 28व्या ओव्हरमध्ये शमीविरुद्ध खेळताना केएल राहुलकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर, रुटने अनुभवी जॉनी बेयरस्टोच्या साथीने संघाचा डाव उभा करण्यास सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली.

रुट आणि बेअरस्टोची जोडी जमलेली व दोघांनी काही आक्रमक फटके खेळत संघाचा डाव भक्कमपणे सावरला. यादरम्यान, रुटने कसोटी कारकिर्दीतील 50 वे अर्धशतकही पूर्ण केले पण शमीने अखेर त्यांची भागीदारी मोडून भारताला मोठे यश मिळवून दिले. बेअरस्टो पाठोपाठ शमीने डॅन लॉरेन्सला देखील पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. जोस बटलर देखील काही खास करू शकला नाही व भोपळा न फोडता माघारी परतला. त्यानंतर शार्दूलने कर्णधार रूटचा अडथळा दूर केला व टीमला मोठा दिलासा दिला.