IND vs ENG 1st Test 2021: भारत (India) दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने (England) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) नुकत्याच संपुष्टात आलेल्या सामन्यात विजय मिळवत शानदार सुरुवात केली आहे. इंग्लंडने दिलेल्या 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान टीम इंडिया 192 धावाच करू शकली आणि त्यांनी चेन्नईमध्ये 277 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. शुभमन गिल (Shubman Gill) आणि कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) अर्धशतकी खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यास ती पुरेशी ठरली नाही. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासून इंग्लंड गोलंदाजांनी दबदबा बनवला होता. जेम्स अँडरसनने एकाच ओव्हरमध्ये टीम इंडियाला (Team India) दोन झटके दिले तर जॅक लीचच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाला पत्करावा लागला. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचे विश्लेषण केल्यास आपल्याला अनेक कारणं सापडतील. (ICC World Test Championship: इंग्लंडची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप रँकिंगमध्ये गरुडझेप, विराटसेनेची या स्थानी घसरण)
1. भारताची फिरकी गोलंदाजी
दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनच्या 6 विकेट वगळता पहिल्या डावात इंग्लंड फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंची चांगलीच धुलाई केली. शाहबाझ नदीमने सर्वाधिक 167 धावा दिल्या. अश्विनने 146 आणि वॉशिंग्टन सुंदरने 98 धावा दिल्या.
2. इंग्लंडच्या फिरकीत अडकले भारतीय शेर
इंग्लंड फलंदाज भारतीय फिरकीपटूंवर वर्चस्व गाजवत असताना विराटसेना इंग्लंडच्या फिरकीत अडकले. पहिल्या डावात विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा फिरकी गोलंदाजी खेळण्यात अपयशी ठरले. पहिल्या सामन्यात एकूण 11 विकेट फिरकीपटूंनी घेतल्या.
3. जो रूटचे द्विशतक
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने भारतीय फिरकी गोलंदाजीचा संयमीपणे सामना करत द्विशतकी खेळी केली. रुटने पहिल्या कसोटी सामन्यात 218 धावांची खेळी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रुटच्या अर्धशतकाच्या जोरावरच पहिल्या डावांत पाहुण्या संघाने 578 धावांचा डोंगर उभारला.
4. एकही मोठी भागीदारी नाही
इंग्लंडकडून जो रूटने पहिल्या डावात डॉम सिब्लीसह द्विशतकी आणि बेन स्टोक्ससह शतकी भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येचा दिशेने नेले. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या 119 धावांची भागीदारी वगळता अन्य भारतीय खेळाडू एकही मोठी भागीदारी करू शकले नाही.
5. सलामी जोडीचे अपयश
भारताच्या पराभवाचे मुख्य कारण सलामी जोडीच्या अपयशाला दिले जाऊ शकते. क्रिकेटमध्ये सलामी जोडीच्या भागीदारीला मोठे महत्व असते, पण भारतीय संघाच्या पराभवाच्या महत्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे अपयशी सलामी जोडी. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने दोन्ही डावांमध्ये निराशा केली. दोघांनी पहिल्या डावात 19 तर दुसऱ्या डावात 25 धावा जोडल्या. युवा शुबमनला दोन्ही डावात चांगली सुरुवात मिळाली. पण त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. गिलने पहिल्या डावात 29 तर दुसऱ्या डावात 50 धावा केल्या. शिवाय, रोहित दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरला. रोहितने अनुक्रमे 6 आणि 12 धावा केल्या.