IND vs BAN 2nd T20I: रोहित शर्मा याची शानदार फलंदाजी; 8 विकेटने विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने केली बरोबरी
रोहित शर्मा आणि शिखर धवन (AP/PTI Photo)

रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने (Indian Team) बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात विकेटने विजयाची नोंद केली आहे. यासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. यापूर्वी, बांग्लादेशने दिल्लीमधील मॅच जिंकत 1-0 ने आघाडी मिळवली होती, पण टीम इंडियाने राजकोट सामना जिंकत मालिका बरोबरीत आणली आहे. भारताकडून कॅप्टन रोहितने शानदार फलंदाजी केली. रोहितने 18 वे टी-20 अर्धशतक केले, पण त्याचे शतक मात्र हुकले. रोहित अमिनुल इस्लाम (Aminul Islam) याच्या गोलंदाजीवर 85 धावांवर माघारी परतला. यापूर्वी, टॉस गमावल्यानंतर पहिले फलंदाजी करताना बांग्लादेशने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 153 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने 15.4 ओव्हरमध्ये दोन गडी गमावून सामना जिंकला. बांग्लादेशने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. रोहित आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी पहिल्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली. दोन्ही खेळाडूंमधील ही टी-20 मधील चौथी शंभर किंवा अधिक धावांची सलामी भागीदारी आहेत. (IND vs BAN 2nd T20I: 100 व्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा याची विक्रमी कामगिरी, नोंदवले हे' रेकॉर्ड, वाचा सविस्तर)

भारतासाठी रोहितने शानदार 85 धावा फटकावल्या ज्यामध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. अमीनुलने धवनला बाद करत दोघांमधील भागीदारी मोडली. धवनने 27 चेंडूत 31 धावा केल्या. याच्यानंतर रोहितही अमीनुलच्या चेंडूवर झेलबाद झाला. श्रेयस अय्यर 24 आणि केएल राहुल 8 धावांवर नाबाद राहिले. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांग्लादेशने पॉवरप्लेचा चांगला फायदा उठविला. लिटन दास (Liton Das) आणि मोहम्मद नईम (Mohammad Naim) यांनी 6 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 54 धावा केल्या. याच्यानंतर यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) याने दासला आऊट करण्याची संधी गमावली. पण, आपली चूक दुरुस्त करत दासला 29 धावांवर धावबाद केले. बांग्लादेशला दुसरा फटका नईमच्या रूपाने मिळाला. त्याने 36 धावा केल्या आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या हाती झेलबाद झाला. मागील सामन्यात बांग्लादेशच्या सामन्यात विजयाचा नायक मुशफिकुर रहीमया सामन्यात जास्त धावा करू शकला नाही आणि चार धावांवर झेलबाद झाला. चहलच्या चेंडूवर कृणाल पंड्या याने त्याचा अप्रतिम झेल पकडला. सौम्य सरकार चांगली फलंदाजी करीत होता आणि पंतच्या हाती चहलने त्याला 30 धावांवर झेलबाद केले. आफिफ हुसेन याच्या रुपाने भारताला पाचवी विकेट मिळाली. अफीफने 6 धावा केल्या.

भारताकडून युजवेंद्र चहल याने सर्वाधिक 2 विकेट घेतले. तर दीपक चाहर, वॉशिंग्टन सुंदर आणि खालील अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दोन्ही संघांमधील ही मालिका कोण जिंकले याचा निर्णय 10 नोव्हेंबरला नागपूरमध्ये होईल.