रोहित शर्मा (Photo Credits: Getty Images)

IND vs AUS Test 2020-21: रोहित शर्माने फिटनेस टेस्ट (Rohit Sharma Fitness Test) पास केली आहे आणि ततो लवकरच ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघात (Indian Team) सामील होईल अशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी याची पुष्टी केली. ऑस्ट्रेलियात 14 दिवसांच्या क्वारंटाइन नियमांमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून रोहित शर्माला (Rohit Sharma) यापूर्वीच बाहेर केले गेले आहे. मात्र, त्याच्या खेळण्यावर अजूनही संभ्रम कायम आहे. उर्वरित दोन कसोटींमध्ये त्याची निवड टीमच्या वैद्यकीय पथकाने 14 दिवसांच्या अनिवार्य क्वारंटाइन कालावधीनंतर दिलेल्या रिपोर्टनंतर त्याच्या खेळण्यावर निर्णय घेतला जाईल. “रोहितला दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी क्वारंटाइन ठेवण्यासाठी विस्तृत कार्यक्रम देण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वैद्यकीय संघाद्वारे क्वारंटाइननंतर त्याचे पुनर्मूल्यांकन केले जाईल आणि त्यानुसार बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्यावर निर्णय घेतला जाईल," बीसीसीआयने (BCCI) आपापल्या निवेदनात म्हटले. (IND vs AUS Test 2020: टीम इंडियासाठी खुशखबर! रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास)

आयपीएल दरम्यान दुखापतीमुळे चार लीग सामन्यांतून बाहेर बसल्यावर रोहितने कमबॅक केले आणि फायनलमध्ये 51 चेंडूत 68 धावा करत मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या दरम्यान, रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघात निवड झाली, पण 11 नोव्हेंबर रोजी दुबईहून सिडनीला टीम इंडियासोबत रवाना न होता मायदेशी परतला आणि एनसीएमध्ये फिटनेस मिळवण्याच्या प्रयत्नात लागला. भारत-ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेला 17 डिसेंबरला सुरुवात होणार आहे. पहिला सामना अ‍ॅडिलेड येथे खेळला जाईल, तर 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे सामना खेळला जाईल. रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे होणाऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे जो 7 जानेवारीपासून सुरू होईल. आयपीएल मॅच दरम्यान रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती.

फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नंतर धावणे यापासून प्रत्येक आघाडीवर रोहितची एनसीएमध्ये टेस्ट झाली. वैद्यकीय पथकाने त्याला फिटनेसवर सतत काम करण्यास सांगितले आहे. रोहितच्या दुखापतीमुळे बराच गोंधळ उडाला होता. ऑस्ट्रेलियामध्ये एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहली म्हणाला की, रोहितच्या दुखापतीबद्दल त्याला अंधारात ठेवले आहे. रोहित ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर का आला नाही याबद्दल आपल्याला कल्पना नाही, असेही तो म्हणाला. नंतर बीसीआयला निवेदन जाहीर करत रोहितच्या दुखापतीविषयी स्पष्टीकरण द्यावे लागले होते.